हैदराबादविरुद्ध पहिल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्ज संघाने अटीतटीच्या लढाईत विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज फाफ डुप्लेसिस या सामन्यात चेन्नईसाठी विजयाचा हिरो ठरला. डुप्लेसिसच्या नाबाद अर्धशतकी खेळीसाठी त्याला सामनाविराचा किताब देऊन गौरवण्यात आलं. मात्र हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठी फाफ डुप्लेसिस हा चेन्नईच्या संघाची पहिली पसंती नव्हता. चेन्नईचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी याबद्दलची कबुली दिली आहे.
अवश्य वाचा – फाफ डुप्लेसिसने माझा विश्वास सार्थ ठरवला, कर्णधार धोनीकडून डुप्लेसिसच्या खेळीचं तोंडभरुन कौतुक
“अखेरच्या साखळी सामन्यादरम्यान सॅम बिलिंग्ज विचित्र पद्धतीने जायबंदी झाला होता. तो हैदराबादविरुद्धच्या सामन्यात खेळू शकला असता, मात्र आम्हाला जोखीम पत्करायची नव्हती. याच कारणासाठी आम्ही डुप्लेसिसला संघात जागा देण्याचं ठरवलं. यानंतर फलंदाजीच्या क्रमवारीतही आम्ही बदल करण्याचं ठरवलं. सुदैवाने हा प्रयोग यशस्वीही झाला.” सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फ्लेमिंगने पत्रकारांशी संवाद साधला.
अवश्य वाचा – चेन्नईवर डुप्लेसिस प्रसन्न, अटीतटीच्या लढतीत हैदराबादवर मात करत गाठली अंतिम फेरी
९२ धावांमध्ये ७ गडी माघारी परतलेले असताना डुप्लेसिसने एका बाजूने संघाची बाजू लावून धरत आपलं आव्हान कायम राखलं. ज्या खेळाडूला आतापर्यंत फारशे सामने खेळायची संधी मिळाली नाही, अशा फलंदाजाला महत्वाच्या सामन्यात फलंदाजीची संधी मिळणं हे प्रतिस्पर्धी गोलंदाजांसाठी आव्हानात्मक असतं. फाफच्या बाबतीत आमची हीच रणनिती कामाला आली. फ्लेमिंगने डुप्लेसिच्या खेळीचं कौतुक केलं. आयपीएलमध्ये हैदराबादच्या संघाला अंतिम फेरी गाठण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे. कोलकाता विरुद्ध राजस्थान सामन्यातील विजयी संघासोबत हैदराबादला दोन हात करावे लागणार आहेत. त्यामुळे अंतिम फेरीत चेन्नईसमोर कोणत्या संघाचं आव्हान येतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अवश्य वाचा – मुंबईकर शार्दुल ठाकूर ठरला चेन्नईच्या विजयाचा हीरो