हर्षल पटेलच्या अष्टपैलू खेळाच्या बळावर दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) चेन्नई सुपर किंग्जला ३४ धावांनी धूळ चारली. या विजयामुळे गुणतालिकेतील समीकरणांवर फारसा काही फरक पडला नाही, परंतु दिल्लीने त्यांचा आत्मसन्मान राखला आहे. १६३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईने निर्धारित षटकांत फक्त १२८ धावा केल्या.
प्रथम फलंदाजी करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली. पृथ्वी शॉ अवघ्या १७ धावांवर दीपक चहरच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर, कर्णधार श्रेयस अय्यर (१९ धावा) आणि ऋषभ पंत (३८ धावा) या दिल्लीच्या मुख्य आधारस्तंभानी दुसऱ्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली. मात्र लुंगी एन्गिडीने एकाच षटकात दोघांनाही माघारी पाठवून दिल्लीचे कंबरडे मोडले. मग ग्लेन मॅक्सवेल (५ धावा) आणि अभिषेक शर्माही (२ धावा) लगेच बाद झाल्याने दिल्ली संघ अडचणीत सापडला. ९७ धावांवर निम्मा संघ माघारी परतला असताना अष्टपैलू विजय शंकर आणि हर्षल यांनी संघाचा डाव सावरला. दोघांनीही सहाव्या विकेटसाठी ६५ धावांची अभेद्य भागीदारी रचली. ड्वेन ब्राव्होच्या शेवटच्या षटकांत दोघांनी मिळून चार षटकार ठोकत २६ धावा कुटल्या व दिल्लीला २० षटकांत १६२ धावांपर्यंत मजल मारून दिली.
बाद फेरी आधीच गाठल्यामुळे चेन्नई या सामन्यात फलंदाजीच्या क्रमवारीत बदल करेल असे चाहत्यांना वाटत होते. मात्र शेन वॉटसन आणि अंबाती रायुडू यांनी सलामीला येत पुन्हा एकदा संघाला चांगली सुरुवात करून दिली. ६.५ षटकांत ४६ धावांची सलामी देऊन वॉटसन १४ धावांवर बाद झाला. रायुडूने आपला शानदार फॉर्म या सामन्यातही चालू ठेवताना स्पर्धेतील तिसऱ्या अर्धशतकाची नोंद केली. त्याने २९ चेंडूंत चार चौकार व चार षटकारांसह ५० धावा केल्या. मॅक्सवेलने अप्रतिम झेल घेत त्याची खेळी संपुष्टात आणली. पुढे सुरेश रैना (१५ धावा) आणि महेंद्रसिंग धोनीदेखील (१७ धावा) फार काळ तग न धरू शकल्यामुळे चेन्नईला पराभव पत्करावा लागला.
संक्षिप्त धावफलक
दिल्ली डेअरडेव्हिल्स : २० षटकांत ५ बाद १६२ (ऋषभ पंत ३८, हर्षल पटेल ३६; लुंगी एन्गिडी २/१४) वि. वि. चेन्नई सुपर किंग्ज : २० षटकांत ६ बाद १२८ धावा (अंबाती रायुडू ५०, महेंद्रसिंग धोनी १७; अमित मिश्रा २/२०, हर्षल पटेल १/२३).
It's all over here as the @DelhiDaredevils beat #CSK by 34 runs at the Kotla.#DDvCSK pic.twitter.com/WWJmqYx5LH
— IndianPremierLeague (@IPL) May 18, 2018
- दिल्लीचा चेन्नईवर ३४ धावांनी विजय
- अमित मिश्राच्या गोलंदाजीवर शेन वॉटसन माघारी, चेन्नईला पहिला धक्का
- अंबाती रायडू-शेन वॉटसन द्वारे आक्रमक फटकेबाजी
- चेन्नईकडून डावाची आक्रमक सुरुवात
- चेन्नईला विजयासाठी १६३ धावांचं आव्हान
- २० षटकांमध्ये दिल्लीची १६२ धावांपर्यंत मजल
- दोघांमध्ये ६५ धावांची नाबाद शतकी भागीदारी
- हर्षल पटेल-विजय शंकर जोडीची अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी
- दिल्लीचा निम्मा संघ तंबूत परतला
- ठराविक अंतराने शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर अभिषेक शर्मा माघारी
- मॅक्सवेलकडून फलंदाजीत निराशा
- रविंद्र जाडेजाकडून ग्लेन मॅक्सवेलचा अडसर दूर, दिल्लीचा चौथा गडी माघारी
- त्याच षटकात ऋषभ पंत मोठा फटका खेळताना माघारी, दिल्लीचा तिसरा गडी माघारी
- कर्णधार श्रेयस अय्यर माघारी, एन्जिडीने उडवला त्रिफळा
- ऋषभ पंतची फटकेबाजी, दिल्लीने ओलांडला ५० धावांचा टप्पा
- ऋषभ पंत-श्रेयस अय्यर जोडीने दिल्लीचा डाव सावरला
- दिल्लीचा पहिला गडी माघारी
- दिपक चहरच्या गोलंदाजीवर पृथ्वी शॉ मोठा फटका खेळताना माघारी
- दिल्लीच्या सलामीवीरांकडून डावाची सावध सुरुवात
- चेन्नईने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय