गौतम गंभीरने अकराव्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सला रामराम करत दिल्लीच्या संघाचा रस्ता धरला. यानंतर दिनेश कार्तिककडे कोलकात्याच्या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. कार्तिकच्या नेतृत्वाखाली कोलकात्याच्या संघाने प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवलं, मात्र अंतिम फेरीचं तिकीट त्यांना मिळवता आलं नाही. घरच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात सनराईजर्स हैदराबादने कोलकात्यावर १४ धावांनी मात करत अंतिम फेरी गाठली. मात्र यादरम्यान हैदराबादविरुद्धच्या सामन्यात दिनेश कार्तिक आपल्या गोलंदाजावर संतापून अपशब्द उच्चारल्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे.
सामन्यात पहिली गोलंदाजी करताना, आठव्या षटकात कुलदीप यादवने शिखर धवन व केन विल्यमसनला माघारी धाडत पाहुण्या संघाला धक्का दिला. यावेळी दिनेश कार्तिकने आक्रमक क्षेत्ररक्षण करत हैदराबादच्या संघावर दबाव वाढवला. मात्र प्रसिध कृष्णाने टाकलेल्या नवव्या षटकात, शाकीब अल हसन फलंदाजी करत असताना एक ओव्हरथ्रो करण्यात आला. यावेळी संतापलेला दिनेश कार्तिक, प्रसिध कृष्णाला नेमकं काय म्हणाला तुम्हीचं ऐका..
Damn Karthik’s got no chill. from r/Cricket
अकराव्या हंगामात कोलकात्याचा प्रवास जरी संपुष्टात आलेला असला, तरीही दिनेश कार्तिकने आपल्या फलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कार्तिक कोलकात्याकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला असून, हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीतही त्याला स्थान मिळालं आहे. १६ सामन्यांमध्ये दिनेश कार्तिकच्या नावावर ४९८ धावा जमा आहेत.