मुंबईच्या वानखेडे मैदानावर चेन्नई सुपरकिंग्जने सनराईजर्स हैदराबादवर मात करुन अंतिम फेरी गाठली. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या धोनीचा विश्वास त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर सलामीवीर शिखर धवनला माघारी धाडत चेन्नईने हैदराबादच्या डावाला मोठं खिंडार पाडलं. चेन्नईकडून ड्वेन ब्राव्होने कालच्या सामन्यात २ बळी घेतले. या सामन्यात ब्राव्होने आपल्याच गोलंदाजीवर युसूफ पठाणच्या घेतलेल्या कॅचची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
सामन्यात्या १५ व्या षटकात ब्राव्होच्या गोलंदाजीवर पठाणने जोरदार फटका खेळला. यावेळी गोलंदाजीच्या फॉलोथ्रुमध्ये असतानाच ब्राव्होने योग्य प्रसंगावधान राखत हा कॅच टिपला. ब्राव्होच्या या चपळाईचं समालोचकांनीही कौतुक केलं.
Bravo! Bravo! What a catch https://t.co/sahNyCKjpZ via @ipl
— Sports Freak (@SPOVDO) May 22, 2018
चेन्नईच्या गोलंदाजांनी केलेल्या माऱ्यासमोर हैदराबादचा डाव १३९ धावांवर आटोपला. मात्र विजयासाठी १४० धावांचं आव्हान असलेल्या चेन्नईच्या संघाची सुरुवातही चांगली झाली नव्हती. सिद्धार्थ कौल, भुवनेश्वर कुमार आणि राशिद खान यांच्या माऱ्यासमोर चेन्नईचा संघ पुरता कोलमडला होता. मात्र फाफ डुप्लेसिसने शार्दुल ठाकूरसोबत फटकेबाजी करत आपल्या संघाला थरारक विजय मिळवून दिला.