मुंबईच्या वानखेडे मैदानावर हजारो प्रेक्षकांच्या साथीने, चेन्नई सुपरकिंग्जने आपण आयपीएलमधले सर्वात प्रसिद्ध संघ का आहोत याची जाणीव सर्वांना करुन दिली आहे. सलामीवीर शेन वॉटसनचं नाबाद आक्रमक शतक आणि त्याला चेन्नईच्या इतर फलंदाजांनी दिलेली साथ या जोरावर, अंतिम सामन्यात चेन्नईने हैदराबादचा ८ गडी राखून पराभव केला. हैदराबादने विजयासाठी दिलेलं १७९ धावांचं आव्हान चेन्नईने अवघ्या २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. हैदराबादविरुद्ध पहिल्याच सामन्यात चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला फाफ डुप्लेसिस अंतिम सामन्यात फारशी चमक दाखवू शकला नाही. दुसरीकडे शेन वॉटसननेही आपल्या डावातील पहिले ९ चेंडू हे निर्धाव खेळून काढले. मात्र डु प्लेसिस माघारी परतल्यानंतर वॉटसन आणि रैना जोडीने संघाची सुत्र आपल्या हाती घेत चौफेर फटकेबाजी करायला सुरुवात केली.

दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. यादरम्यान सामना हैदराबादच्या हातून निसटला होता. ही जोडी फोडण्यासाठी हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने प्रयत्नांची पराकाष्टा केली, मात्र त्याच्या सर्वच गोलंदाजांना यात अपयश आलं. अखेर कार्लोस ब्रेथवेटने सुरेश रैनाला माघारी धाडलं घरं, मात्र तोपर्यंत सामना हैदराबादच्या हातून निसटला होता. कोलकात्याविरुद्ध सामन्यात चमकदार कामगिरी करणारी हैदराबादची गोलंदाजी या सामन्यात पुरती निष्प्रभ ठरली. हैदराबादकडून संदीप शर्मा आणि कार्लोस ब्रेथवेटने सामन्यात प्रत्येकी १-१ बळी घेतला.

त्याआधी चेन्नईच्या गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी माऱ्यासमोर अकराव्या हंगामाच्या अंतिम सामन्यात सनराईजर्स हैदराबाद संघाला १७८ धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या महेंद्रसिंह धोनीचा विश्वास त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. सलामीवीर श्रीवत्स गोस्वामी माघारी परतल्यानंतर, शिखर धवन आणि कर्णधार केन विल्यमसनने काही क्षणांसाठी संघाचा डाव सावरला. या दोन्ही खेळाडूंमध्ये दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीही झाली. मात्र ही जोडी फुटल्यानंतर हैदराबादचे फलंदाज मोठी भागीदारी रचण्यामध्ये अपयशी ठरले. छोटेखानी भागीदाऱ्या रचल्यानंतर हैदराबादचे फलंदाज माघारी परतत राहिले. अखेर तळातल्या युसूफ पठाण आणि कार्लोस ब्रेथवेटने फटकेबाजी करत संघाला १७८ धावांपर्यंत मजल मारुन दिली. चेन्नईकडून दिपक चहरचा अपवाद वगळता सर्व गोलंदाजांना १-१ बळी मिळाला आहे.

  • चेन्नई सामन्यात विजयी, हैदराबादवर ८ गडी राखून केली मात
  • शेन वॉटसनचं सामन्यात झुंजार शतक
  • चेन्नईचे २ गडी माघारी, सामन्यावर मात्र मजबूत पकड
  • अखेर सुरेश रैना माघारी, कार्लोस ब्रेथवेटने घेतला बळी
  • दुसऱ्या विकेटसाठी शेन वॉटसन – सुरेश रैना जोडीमध्ये ११७ धावांची शतकी भागीदारी
  • वॉटसनचं धडाकेबाज अर्धशतक
  • शेन वॉटसनची मैदानात चौफेर फटकेबाजी
  • वॉटसन-रैना जोडीने चेन्नईचा डाव सावरला
  • चेन्नईला पहिला धक्का, फाफ डुप्लेसिस माघारी
  • दुसऱ्या षटकापासून चेन्नईच्या फलंदाजांची सावध सुरुवात
  • हैदराबादच्या संघाची आक्रमक सुरुवात, भुवनेश्वर कुमारकडून पहिलं षटक निर्धाव
  • चेन्नईला विजयासाठी १७९ धावांचं आव्हान
  • २० षटकात हैदराबादची १७८ धावांपर्यंत मजल
  • अखेरच्या षटकातील अखेरच्या चेंडूवर कार्लोस ब्रेथवेट माघारी
  • एन्गिडीच्या गोलंदाजीवर दिपक हुडा बाद, निम्मा संघ माघारी
  • ब्राव्होच्या गोलंदाजीवर शाकीब माघारी, हैदराबादला चौथा धक्का
  • युसूफ-शाकिब अल हसनमध्ये छोटेखानी भागीदारी
  • हैदराबादचे ३ गडी माघारी
  • हैदराबादला मोठा धक्का, कर्णधार केन विल्यमसन माघारी
  • विल्यमसन-शाकीब अल हसन जोडीकडून फटकेबाजीचा प्रयत्न
  • हैदराबादचा दुसरा गडी माघारी
  • अखेर हैदराबादची जमलेली जोडी फुटली, रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर धवन माघारी
  • दुसऱ्या विकेटसाठी दोघांमध्ये ५१ धावांची अर्धशतकी भागीदारी
  • हैदराबादने ओलांडला ५० धावांचा टप्पा
  • केन विल्यमसन-शिखर धवन जोडीने संघाचा डाव सावरला
  • चोरटी धाव घेताना श्रीवत्स गोस्वामी धावबाद, हैदराबादला पहिला धक्का
  • हैदराबादच्या सलामीवीरांची सावध सुरुवात
  • चेन्नईने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

Story img Loader