स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगून पुनरागमन केल्यानंतर, चेन्नई सुपरकिंग्जने आयपीएलच्या अकराव्या हंगामाचं विजेतेपद पटकावलं. हैदराबादच्या संघाने २० षटकात दिलेलं १७९ धावांचं आव्हान चेन्नईने शेन वॉटसनच्या शतकी खेळीच्या आधारे सहज पार केलं. शेन वॉटसनने ५७ चेंडूत ११७ धावांची नाबाद शतकी खेळी केली. आयपीएलमधलं चेन्नई सुपरकिंग्जचं हे तिसरं विजेतेपद ठरलं. याआधी मुंबई इंडियन्सने तीन वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.
रविवारी मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात ५ विक्रमांची नोंद करण्यात आलेली आहे.
१) आयपीएलच्या अंतिम फेरीत धावसंख्येचा पाठलाग करताना शतक झळकावणारा शेन वॉटसन हा पहिला खेळाडू ठरला आहे. वृद्धिमान साहाने याआधी २०१४ साली आयपीएलच्या अंतिम फेरीत शतक झळकावलं होतं, मात्र साहाचा किंग्ज इलेव्हन पंजाब संघ अंतिम फेरीत पराभूत झाला होता.
२) एखाद्या संघाने एका संघाला एकाच हंगामात आतापर्यंत ४ वेळा पराभूत केलं नव्हतं. २०१८ साली चेन्नई सुपरकिंग्ज संघाने ही किमया साधली आहे. साखळी फेरीत दोनदा, एकदा क्वालिफायर सामन्यात व एकदा अंतिम फेरीत चेन्नईने हैदराबादवर मात केली आहे.
३) रोहित शर्माच्या नावावर आतापर्यंत ४ आयपीएल विजेतेपद जमा आहेत. (३ वेळा मुंबई इंडियन्स, १ वेळा डेक्कन चार्जर्स) या पंक्तीत आता अंबाती रायडू आणि हरभजनसिंह यांनाही स्थान मिळालं आहे.
४) चेन्नई सुपरकिंग्जने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या ३ वेळा विजेतेपद मिळवण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
५) सुरेश रैनाने आतापर्यंत ३ वेळा चेन्नई सुपरकिंग्जकडून आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. धोनीने ४ वेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. (३ वेळा चेन्नई सुपरकिंग्ज, १ वेळा पुणे सुपरजाएंट)