आयपीएलमध्ये तिसरं विजेतेपद पटकावून चेन्नई सुपरकिंग्जने मोठ्या दिमाखात पुनरागमन केलं आहे. अकरापैकी आपली सातवी आयपीएलची अंतिम फेरी खेळणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्जने मुंबई इंडियन्सच्या सर्वाधिक ३ वेळा विजेतेपद मिळवण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. शेन वॉटसनच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर चेन्नईने हैदराबादवर ८ गडी राखून मात करत अंतिम फेरीवर आपली मोहर उमटवली. चेन्नईच्या संघातले बहुतांश खेळाडू हे वयाची तिशी ओलांडलेले आहेत, त्यामुळे चेन्नईला आयपीएलमधला अनुभवी संघ म्हणून ओळखलं जातं.

सामना संपल्यानंतर पारितोषिक वितरण समारंभारत धोनीने आपल्या संघाच्या कामगिरीबद्दल बोलत असताना टीकाकारांची तोंड बंद केली. “आपण खेळाडूंच्या वयाबद्दल प्रचंड चर्चा करतो, मात्र माझ्या मते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे खेळाडूचा फिटनेस. अंबाती रायडू आता ३३ वर्षाचा आहे, मात्र मैदानात आजही तो एखाद्या तरुण खेळाडूसारखा खेळतो. याचसोबत एखाद्या फलंदाजाला एकेही-दुहेरी धावा घ्यायच्या नसतील तर त्याला विचार करत बसावा लागत नाही. तो आपल्या फलंदाजीच्या शैलीत बदल करत त्यावेळी फटकेबाजी करतो. त्यामुळे माझ्यामते महत्वाच्या सामन्यात तुमचं वय तुमच्या खेळाच्या आड येत नाही, मैदानात तुमचा अनुभव बोलतो.”

आयपीएलचा अकरावा हंगाम जिंकल्यानंतर सध्या चेन्नई सुपकिंग्जचा सेलिब्रेशनचा कोणताही इरादा नसल्याचं धोनीने सांगितलं. आज म्हणजेच सोमवारी धोनी आणि संपूर्ण संघ चेन्नईला रवाना होणार आहे, कावेरी पाणीवाटपाच्या मुद्द्यावरुन चेपॉकचं मैदान सोडावं लागलेल्या चेन्नईच्या चाहत्यांची भेट घ्यायची असल्याचंही धोनीने यावेळी आवर्जून सांगितलं.

Story img Loader