आयपीएलच्या अकराव्या हंगामात दिल्ली डेअरडेविल्स संघाची कामगिरी फारशी चांगली झालेली नाहीये. एका आठवड्यानंतर दिल्लीचा संघ गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर आहे, यापाठोपाठ दिल्लीला आणखी एक धक्का बसला आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघ सोडून स्वगृही परतलेल्या गौतम गंभीरने दिल्लीच्या कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. गौतमच्या अनुपस्थितीत मुंबईकर श्रेयस अय्यर दिल्लीचा नवा कर्णधार असणार आहे. संघ प्रशासन, मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटींग यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“आतापर्यंत दिल्लीच्या संघाने जी काही कामगिरी केली आहे, त्याची कर्णधार या नात्याने मी जबाबदारी स्विकारतो आहे. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये मी कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मी माझ्या फलंदाजीकडे अधिक लक्ष देऊ शकेन. श्रेयस अय्यर संघाचा नवीन कर्णधार असेल. माझ्यामते आगामी सामन्यात आम्ही चांगला खेळ केला तर आम्ही अजुनही स्पर्धेत कायम राहू शकतो.” गौतमने राजीनाम्यावर आपली प्रतिक्रीया व्यक्त केली.

अवश्य वाचा – IPL 2018 – सनराईजर्स हैदराबादला मोठा धक्का, महत्वाचा खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर

तब्बल ८ वर्षांच्या कालावधीनंतर गौतम गंभीरने आपल्या स्वगृही पुनरागमन केलं होतं. याआधी २००८-२०१० या कालावधीत गौतम दिल्लीच्या संघाकडून खेळला होता. दिल्लीचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटींग यानेही गौतमच्या निर्णयाला आपला पाठींबा दर्शवला आहे.  त्यामुळे कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर फलंदाज म्हणून गौतम गंभीर कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०१८ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2018 gautam gambhir steps down shreyas iyer appointed captain for dd