आयपीएलच्या अकराव्या हंगामात कर्णधार दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली नव्याने सुरुवात करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. उर्वरित हंगामाकरता कोलकात्याने मुंबईच्या अभिषेक नायरला संघाच्या मार्गदर्शकपदी नेमलं आहे. कोलकात्याचा कर्णधार दिनेश कार्तिकला आंतरराष्ट्रीय सामन्यात पुनरागमन करण्यासाठी अभिषेक नायरने मदत केल्याच्या बातम्या मध्यंतरी समोर आल्या होत्या. त्यामुळे अभिषेकच्या अंगातले हे गूण लक्षात घेऊन कोलकाता नाईट रायडर्सच्या संघ व्यवस्थापनाने त्याला मार्गदर्शक पदावर नियुक्त केलं आहे.
Drumrolls
We are happy to announce the veteran of Mumbai Cricket, @abhisheknayar1 as a part of our support staff.
He brings rich T20 experience with ball and bat.#KKRHaiTaiyaar #IPL2018— KolkataKnightRiders (@KKRiders) April 15, 2018
“आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाला मार्गदर्शन करता येणं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा मी मनापासून प्रयत्न करेन”, असं अभिषेक नायर म्हणाला. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये अभिषेक नायर मुंबईचं प्रतिनिधीत्व करतो. आपल्या ८ वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीतल अभिषेकने मुंबई इंडियन्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, पुणे वॉरियर्स आणि राजस्थान रॉयल्स या चार संघांचं प्रतिनिधीत्व केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अभिषेक नायरला अन्य संघांकडूनही प्रशिक्षक पदाच्या ऑफर आल्या होत्या. मात्र अभिषेकने कोलकाता नाईट रायडर्स संघाला आपली पसंती दिली आहे. त्यामुळे अभिषेकच्या येण्याने कोलकात्याचा संघ उर्वरित सामन्यांमध्ये कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.