विराट कोहली आणि पार्थिव पटेलच्या नाबाद अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने किंग्ज इलेव्हन पंजाबवर १० गडी राखून विजय मिळवला. विजयासाठी पंजाबच्या संघाने दिलेलं ८९ धावांचं आव्हान बंगळुरुच्या फलंदाजांनी फटकेबाजी करत नवव्या षटकात लिलया पार केलं. या विजयासह प्ले-ऑफच्या शर्यतीत विराटच्या संघाने गुणतालिकेत अधिक रंगत आणली आहे. आजच्या विजयाने प्ले-ऑफच्या शर्यतीत कोहलीच्या संघाने आपलं आव्हान कायम राखलं आहे. त्यामुळे आगामी काळात आयपीलचे सामने अधिक रंगतदार होणार आहेत.
त्याआधी उमेश यादव आणि बंगळुरुच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर घरच्या मैदानावर खेळताना किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाची अक्षरशः दाणादाण उडाली. आक्रमक सुरुवात होऊनही एकामागोमाग एक विकेट पडण्याचं सत्र सुरु राहिल्यामुळे पंजाबचा संपूर्ण डाव ८८ धावांमध्ये आटोपला. पंजाबकडून मधल्या फळीत अॅरोन फिंचचा अपवाद वगळता एकही फलंदाज बंगळुरुच्या गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. आयपीएलच्या अकराव्या हंगामातली ही सर्वात कमी धावसंख्या नोंदवली गेली आहे.
- १० गडी राखून बंगळुरु सामन्यात विजयी
- विराट कोहली-पार्थिव पटेल जोडीची चौफेर फटकेबाजी, दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी
- बंगळुरुच्या फलंदाजांची आक्रमक सुरुवात
- बंगळुरुला विजयासाठी ८९ धावांची गरज
- पंजाबचा अखेरचा गडीही धावबाद, ८८ धावांमध्ये पंजाबचा संघ सर्वबाद
- मोहित शर्मा धावबाद, पंबाजचा नववा गडी माघारी
- अँड्रू टाय माघारी, पंबाजला आठवा धक्का
- पंजाबचे फलंदाज माघारी परतण्याचं सत्र सुरुच
- लागोपाठ रविचंद्रन आश्विन चोरटी धाव घेताना धावबाद, पंजाबचा सातवा गडी माघारी परतला
- मोईन अलीच्या गोलंदाजीवर फिंच माघारी, पंजाबला सहावा धक्का
- फिंचकडून सामन्यात जोरदार फटकेबाजी
- अॅरोन फिंच – अक्षर पटेल यांच्याकडून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न
- कॉलिन डी-ग्रँडहोमच्या गोलंदाजीवर अग्रवाल माघारी, पंजाबचा निम्मा संघ माघारी परतला
- मयांक अग्रवाल – अॅरोन फिंच जोडीकडून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न
- पंजाबची घसरगुंडी सुरुच, चहलच्या गोलंदाजीवर स्टॉयनिस त्रिफळाचीत
- मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर करुण नायर माघारी, पंजाबचा तिसरा गडी माघारी
- लागोपाठ उमेश यादवच्या गोलंदाजीवर ख्रिस गेल माघारी, पंजाबला दुसरा धक्का
- मोठा फटका खेळण्याच्या नादात लोकेश राहुल बाद
- अखेर पंजाबचा पहिला गडी माघारी, लोकेश राहुल माघारी
- संधी मिळताच लोकेश राहुल आणि ख्रिस गेल यांच्याकडून फटकेबाजीला सुरुवात
- पहिल्या दोन षटकांमध्ये बंगळुरुच्या गोलंदाजांचा टिच्चून मारा
- बंगळुरुने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय