आयपीएलच्या यंदाच्या मोसमात विजयाची हॅट्ट्रीक करणाऱ्या सनरायजर्स हैदराबादला गुरुवारी अखेर किंग्ज इलेव्हन पंजाबने रोखले. पंजाबच्या विजयाचा नायक ठरला तो ख्रिस गेल. आयपीएलच्या लिलावत ज्या गेलवर कोणी बोली लावायला तयार नव्हते त्याच गेलने जागतिक क्रिकेटमध्ये आपल्याला धोकादायक फलंदाज का म्हटले जाते ते दाखवून दिले. गेलच्या (१०४) तुफानी शतकाच्या बळावर पंजाबने हैदराबादवर १५ धावांनी विजय मिळवला. पंजाबने विजयासाठी दिलेल्या १९४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादला निर्धारीत २० षटकात फक्त १७८ धावाच करता आल्या.

हैदराबादच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. सुरुवातीलाच सलामीवीर शिखर धवन एकही धाव न काढता जायबंदी झाला. त्याचा फटका हैदराबादला बसला. दुसरा सलामीवीर वुद्धीमान सहा अवघ्या (६) धावांवर बाद होऊन तंबूत परतला. त्यानंतर कर्णधार केन विलमयसनने अर्धशतकी (५४) खेळी करुन डाव सावरला. मनिष पांडेनेही शानदार फलंदाजी करताना ४२ चेंडूत नाबाद (५७) धावांची खेळी केली. या दोघांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज चमकदार कामगिरी करु शकले नाहीत. हैदराबादने सामन्याच्या अखेरीस धावगती वाढवली पण तो पर्यंत उशीर झाला होता.

आजचा दिवस खऱ्या अर्थाने गाजवला तो ख्रिस गेलने. त्याने ६३ चेंडूत नाबाद (१०४) धावा केल्या. मैदानावर चौफेर फटकेबाजी करणाऱ्या गेलने ११ षटकार आणि १ चौकार लगावला. हैदराबादच्या गोलंदाजांचा त्याने अक्षरक्ष पालापाचोळा केला. अन्य संघांच्या तुलनेत हैदराबादची गोलंदाजी मजबूत समजली जाते. पण गेलच्या वादळासमोर त्यांचा टिकाव लागला नाही. राशिद खानच्या ४ षटकात तब्बल ५५ धावा लुटल्या. पंजाबकडून गेलने सर्वाधिक १०४ आणि त्यानंतर करुण नायरने ३१ धावा केल्या. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार, राशिद खान आणि सिद्धार्थ कौलने प्रत्येकी १-१ बळी घेतला.

  • १६.२ षटकात हैदराबादच्या तीन बाद १३२ धावा
  • अर्धशतक झळकावल्यानंतर हैदराबादचा कर्णधार केन विलियमसन (५४) धावांवर बाद.
  • हैदराबादने ओलांडला ५० धावांचा टप्पा
  • हैदराबादची घसरगुंडी सुरुच, युसूफ पठाण माघारी
  • युसूफ पठाण-केन विलियमसन जोडीकडून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • हैदराबादची अडखळती सुरुवात, वृद्धीमान साहा माघारी
  • हैदराबादला विजयासाठी १९४ धावांचं आव्हान
  • ख्रिस गेल १०४ धावांवर नाबाद, २० षटकात पंजाबची १९३ धावांपर्यंत मजल
  • अकराव्या हंगामात आयपीएलमध्ये पहिल्या शतकाची नोंद, पंबाजची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल
  • ख्रिस गेलचं शतक, ५८ चेंडूत पूर्ण केलं शतक.
  • भुवनेश्वर कुमारने घेतली विकेट, पंबाजला तिसरा धक्का
  • नायर- ख्रिस गेलची जोडी फुटली, करुण नायर झेलबाद
  • ख्रिस गेलची वादळी खेळी सुरुच, हैदराबादच्या गोलंदाजांवर हल्लाबोल
  • करुण नायर-ख्रिस गेल जोडीची फटकेबाजी, पंजाबची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल
  • रशिद खानच्या गोलंदाजीवर ख्रिस गेलचे लागोपाठ ४ षटकार
  • हैदराबादच्या गोलंदाजीवर हल्लाबोल करत ख्रिस गेलचं अर्धशतक
  • दुसऱ्या बाजून ख्रिस गेलची फटकेबाजी सुरुच
  • सिद्धार्थ कौलच्या गोलंदाजीवर अग्रवाल झेलबाद, पंबाजचा दुसरा गडी माघारी
  • मयांक अग्रवालकडून फटकेबाजी करण्याचा प्रयत्न
  • राशिद खानच्या गोलंदाजीवर राहुल पायचीत, पंजाबला पहिला धक्का
  • अखेर पंजाबची जोडी फोडण्यात हैदराबादला यश, लोकेश राहुल माघारी
  • दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी, ख्रिस गेलची फटकेबाजी
  • लोकेश राहुल – ख्रिस गेल जोडीची सावध सुरुवात
  • पंजाबने नाणेफेक जिंकली. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय