मुंबई : अ‍ॅण्डय़्रू टायच्या भेदक माऱ्यानंतर लोकेश राहुल अाणि आरोन फिंच यांनी साकारलेल्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाब विजय मिळवेल असे चित्र होते. मात्र, १९व्या षटकात राहुल बाद होऊन माघारी परतला आणि पंजाबच्या तोंडाशी आलेला विजयाचा घास मुंबईने हिस्कावला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या लढतीत मुंबईने ३ धावांनी विजय मिळवला.

अ‍ॅण्डय़्रू टायने भेदक गोलंदाजी करताना आघाडीच्या तीन फलंदाजांना माघारी धाडून मुंबईला अडचणीत आणले. मात्र, कृणाल पंडय़ा व किरॉन पोलार्ड यांनी सुरुवातीला संयमी खेळ करुन मुंबईची पडझड थांबवली आणि स्थिरस्थावर झाल्यानंतर धावांची गती वाढवत मुंबईला १८६ धावांचा समाधानकारक पल्ला गाठून दिला. बाद फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी उभय संघ प्रयत्नशील असल्यामुळे ही लढत चुरशीची होईल, याचा अंदाज सर्वानीच बांधला होता. मात्र, घरच्या मैदानावर मुंबईचे पारडे जड मानले जात होते.

तरीही नाणेफेकीचा कौल बाजूने लागूनही पंजाबने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. फॉर्मात असलेल्या सुर्यकुमार यादवने मुंबईला चांगली सुरुवात करून दिली, परंतु एव्हिन लेविस अवघ्या ९ धावांवर टायच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर टायने सहाव्या षटकात सलामीवीर यादव आणि खेळपट्टीवर तग धरू पाहणाऱ्या इशान किशन यांना सलग दोन चेंडूवर माघारी पाठवले.

कर्णधार रोहित शर्माकडून जबाबदारीने खेळी करण्याची अपेक्षा होती, पंरतु अवघे ३८ प्रथम श्रेणी नावावर असलेल्या अंकित रजपूतने रोहितला धोकादायक फटका मारण्यास भाग पाडले आणि मिड ऑनला युवराज सिंगने झेल टिपत मुंबईच्या चमूत तणाव निर्माण केला. ८.२ षटकांत ४ बाद ७१ अशा बिकट अवस्थेत असताना कृणाल आणि पोलार्ड यांनी मुंबईला आधार दिला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली. कृणाल बाद होताच पोलार्डने सामन्याची सूत्र हाती घेताना वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. कृणाल २३ चेंडूंत १ चौकार आणि २ षटकार लगावत ३२ धावांवर बाद झाला. पोलार्डने २३ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ५० धावांची खेळी केली. अखेरच्या पाच षटकांत मुंबई धावांचा पाऊस पाडून दोनशेपल्ल्याड मजल मारेल, असे वाटत होते. मात्र, पंजाबच्या गोलंदाजांनी सुरेख मारा करत मुंबईची धावगती संथ केली.

प्रत्युत्तरात सलामीवीर ख्रिस गेल लगेच माघारी परतल्यानंतर राहुल आणि फिंच यांनी चिकाटीने खेळ करत पंजाबचा पाया मजबूत केला. राहुलने अर्धशतकी खेळी साकारताना पंजाबच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. त्याला फिंचने तुल्यबळ साथ दिली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १११ धावा जोडल्या. जसप्रीत बुमराने ही जोडी फोडली. फिंच ३५ चेंडूंत ३ चौकार आणि एक षटकार खेचून ४६ धावांवर बाद झाला.

बढती मिळालेला मार्कस स्टॉयनिस (१) प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला. राहुलने अखेपर्यंत खिंड लढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, १९व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर बुमराने त्याला बाद केले. राहुलने ६० चेंडूंत १० चौकार आणि ३ षटकारांसह ९४ धावा चोपल्या. लोकेश बाद झाल्यानंतर अक्षर पटेल आणि अनुभवी फलंदाज युवराज सिंग पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब करतील, ही अपेक्षा फोल ठरली.

धावफलक

मुंबई इंडियन्स : ८ बाद १८६ (किरॉन पोलार्ड ५०, कृणाल पंडय़ा ३२, सुर्यकुमार यादव २७, इशान किशन २०; अ‍ॅण्डय़्रू टाय ४/१६, रवीचंद्रन अश्विन २/१८) वि. वि. किंग्ज इलेव्हन पंजाब :  ५ बाद १८३ (लोकेश राहुल ९४, आरोन फिंच ४६; जस्प्रीत बुमरा ३/१५)

  • मुंबईचा पंजाबवर ३ धावांनी विजय
  • पंजाबचा पाचवा गडी माघारी
  • लोकश राहुल तंबूत परतला, पंजाबला चौथा झटका
  • पंजाबला तिसरा झटका
  • २० षटकात मुंबईची १८६ धावांपर्यंत मजल, पंजाबला विजयासाठी १८७ धावांचं आव्हान
  • अखेरच्या षटकांमध्ये मिचेल मॅक्लेनघनची फटकेबाजी
  • हार्दिक पांड्या माघारी, मुंबईला आठवा धक्का
  • ठराविक अंतराने बेन कटींग माघारी, मुंबईचा सातवा गडी माघारी
  • कायरन पोलार्ड माघारी, मुंबईला सहावा धक्का
  • कायरन पोलार्डची फटकेबाजी, दीर्घ कालावधीनंतर केलं अर्धशतक पूर्ण
  • मुंबईचा निम्मा संघ माघारी
  • अखेर मुंबईची जमलेली जोडी फुटली, कृणाल पांड्या मोठा फटका खेळताना माघारी
  • दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी
  • पोलार्ड – पांड्या जोडीची मैदानाच्या चौफेर फटकेबाजी
  • मुंबईने ओलांडला १०० धावांचा टप्पा
  • कायरन पोलार्ड – कृणाल पांड्या जोडीने संघाचा डाव सावरला
  • अंकीत राजपूतच्या गोलंदाजीवर कर्णधार रोहित शर्मा माघारी, मुंबईचा चौथा गडी बाद
  • लागोपाठच्या चेंडूवर सूर्यकुमार यादव बाद, मुंबईचा तिसरा गडी माघारी
  • टायच्या गोलंदाजीवर किशन माघारी, मुंबईला दुसरा धक्का
  • इशान किशन – सूर्यकुमार यादव जोडीकडून मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • मुंबईला पहिला धक्का, अँड्रू टायच्या गोलंदाजीवर लुईस माघारी
  • सूर्यकुमार यादवकडून फटकेबाजीला सुरुवात, अंकित राजपूतच्या गोलंदाजीवर कुटल्या धावा
  • सूर्यकुमार यादव – एविन लुईस जोडीकडून डावाची सावध सुरुवात
  • पंजाबच्या संघात युवराज सिंहचं पुनरागमन
  • मुंबईच्या संघात पोलार्डचं पुनरागमन, ड्युमिनीला विश्रांती
  • पंजाबने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

Story img Loader