इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) आतापर्यंतच्या तीनही सामन्यात पराभवाचे तोंड पाहणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला पहिल्या विजयाची आस लागली आहे. त्यांच्यासमोर मंगळवारी वानखेडे स्टेडियमवर बलाढय़ रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुचे आव्हान आहे. दोन्ही संघांकडे नावाजलेल्या खेळाडूंचा भरणा आहे, मात्र कोणालाही लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.

मुंबईकडे कर्णधार रोहित शर्मासह, ईविन लेव्हिस, किरॉन पोलार्ड, कृणाल व हार्दिक पंडय़ा असे एकापेक्षा एक धडाकेबाज फलंदाज आहेत. मात्र, त्यांना कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. सूर्यकुमार यादवने मागील सामन्यात चांगली फटकेबाजी केली होती. गोलंदाजीत मयांक मरकडे व्यतिरिक्त कोणालाही आपली छाप पाडता आलेली नाही. विशेष म्हणजे जसप्रीत बुमरा आणि मुस्तफिजूर रहमान यांच्याकडून शेवटच्या षटकांत टिच्चून गोलंदाजी झालेली नाही. जायबंद पॅट कमिन्सच्या जागी वर्णी लागलेला अ‍ॅडम मिल्ने संघात स्थान मिळवण्यासाठी उत्सुक आहे.

दुसरीकडे फॉर्मशी झुंजणाऱ्या बेंगळूरुचा कर्णधार विराट कोहलीने राजस्थान रॉयल्सविरुद्ध अर्धशतक झळकावल्यामुळे बेंगळूरुवासी आनंदी आहेत. क्विंटन डी’कॉक, एबी डी’व्हिलियर्स, मनदीप सिंग यांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे.  उमेश यादव, ख्रिस वोक्स व युजवेंद्र चहल यांना गोलंदाजीत सुधारणा करण्याची गरज आहे.

  • सामन्याची वेळ : रात्री ८ वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स

Story img Loader