आयपीएलचा अकरावा हंगाम ऐन रंगात आलेला असताना, सामन्यांमधल्या वेळापत्रकामध्ये महत्वाचा बदल करण्यात आलेला आहे. आयपीएलचे प्ले-ऑफचे सामने रात्री ८ ऐवजी ७ वाजता खेळवले जाणार आहेत. काही दिवसांपूर्वी आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत यासंदर्भात माहिती दिली होती. मात्र बीसीसीआयमधील काही पदाधिकाऱ्यांनी या बदलाला विरोध दर्शवला होता. मात्र बीसीसीआयने आज अधिकृतरित्या प्रसिद्धीपत्रक काढून सामन्याच्या वेळेतील बदलांवर शिक्कामोर्तब केलं आहे.

“गेल्या दहा वर्षांमध्ये चाहत्यांच्या पाठबळावर आयपीएल प्रसिद्धी मिळवू शकलेलं आहे. त्यामुळे चाहत्यांचा विचार करता प्ले-ऑफ आणि अंतिम सामना एक तास आधी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. अनेकदा ऑफिसच्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या दिवशी कामावर जायचं असल्यामुळे सामने पूर्णपणे पाहता येत नाहीत. या कारणासाठी प्ले-ऑफ आणि अंतिम सामना एक तास लवकर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” राजीव शुक्लांनी आयपीएलमधील बदलांविषयी माहिती दिली. त्यामुळे बीसीसीआयने केलेल्या नवीन बदलांनूसार, २२ मे रोजी मुंबईत, २३ आणि २५ मे रोजी कोलकात्यात आणि २७ मे रोजी मुंबईत होणारा अंतिम सामना रात्री ८ ऐवजी ७ वाजता सुरु होणार आहे.

आयपीएलचा अकरावा हंगाम सुरु होण्याआधीही, सामने ८ ऐवजी ७ वाजता सुरु करण्याची मागणी करण्यात आली होती. यावर गव्हर्निंग काऊन्सिलने संघमालकांची मत मागवली होती, मात्र सुरुवातीच्या दिवसांमध्ये संघमालकांनी या कल्पनेला आपला नकार दर्शवला होता. मात्र नवीन बदलांनुसार ७ वाजता सुरु झालेले सामने १०:३० वाजेपर्यंत संपण्याची शक्यता आहे.

Story img Loader