आयपीएलच्या अकराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जने अटीतटीच्या लढाईत हैदराबादच्या संघावर २ गडी राखून मात केली. चेन्नईसाठी या सामन्याचा हिरो ठरला तो दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज फाफ डुप्लेसिस. हैदराबादच्या माऱ्यासमोर चेन्नईचे महारथी फलंदाज झटपट माघारी परतत असताना, डुप्लेसिसने एका बाजूने किल्ला लढवत ठेवत संघाला विजय मिळवून दिला. अकराव्या हंगामात डुप्लेसिसच्या वाट्याला फारशे सामने आले नसले, तरीही मिळालेल्या संधीचं त्याने पुरेपूर कौतुक करुन दाखवलं. त्याच्या याच खेळीवर संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी भलताच खुश आहे.
हैदराबादविरुद्ध सामन्यात डुप्लेसिसने ४२ चेंडुंमध्ये नाबाद ६७ धावांची आक्रमक खेळी केली. डुप्लेसिसच्या खेळीबद्दल विचारलं असताना धोनी म्हणाला, “अशा प्रसंगांमध्ये तुमचा अनुभव कामी येतो. डुप्लेसिसने आज हे सिद्ध करुन दाखवलं आहे. खडतर प्रसंगात आपण चांगला खेळ करत राहण्यासाठी आत्मविश्वासाची गरज असते. हा आत्मविश्वास अनुभवानेच तुम्हाला मिळत असतो. डुप्लेसिसवर मी जो विश्वास टाकला होता, तो त्याने सार्थ ठरवला”.
याचसोबत धोनीने हैदराबादच्या गोलंदाजांचही कौतुक केलं. सिद्धार्थ कौल आणि भुवनेश्वर कुमारने टिच्चून मारा केला. राशिद खाननेही त्यांना चांगली साथ दिली. लागोपाठ विकेट पडत गेल्यामुळे काहीकाळ आम्हाला पेचात पाडलं होतं, मात्र डुप्लेसिसच्या खेळीमुळे आम्ही अंतिम फेरीत पोहचलो, धोनी बोलत होता. हैदराबादविरुद्ध सामना जिंकून चेन्नईने थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. हैदराबादच्या संघाला अंतिम फेरी गाठण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. राजस्थान विरुद्ध कोलकाता सामन्यातील विजेत्याशी हैदराबादचा सामना रंगणार आहे. या सामन्यातील विजेता संघ हैदराबादशी पुन्हा लढणार आहे. त्यामुळे पुढच्या सामन्यांमध्ये कोण बाजी मारतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.