पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर आज आयपीएलचा १७ वा सामना रंगला. या सामन्यात चेन्नईच सुपर किंग ठरली आहे. कारण चेन्नई सुपरकिंग्जने राजस्थान रॉयल्सवर ६४ धावांनी मात केली आहे. नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सनी सर्वात आधी क्षेत्र रक्षणाचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय राजस्थानच्या संघाला महाग पडला असेच दिसते आहे. चेन्नईने २०४ धावा करत राजस्थानपुढे विजयासाठी २०५ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र राजस्थान रॉयल्सला या आव्हानाचा पाठलाग करताना अपयश आले. त्यामुळे राजस्थानच्या खात्यात आणखी एक पराभव तर चेन्नईच्या खात्यात आणखी एका विजयाची नोंद झाली आहे.
राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्जच्या पुण्यात रंगलेल्या सामन्यात चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो म्हणजे शेन वॉटसन. चेन्नईची फलंदाजी सुरु होती त्यावेळी सूर गवसलेल्या शेन वॉटसनने ५७ चेंडूंमध्ये १०६ धावांची खेळी खेळली. त्याच्या या महत्त्वपूर्ण आणि तडाखेबंद खेळीमुळेच चेन्नईला २०४ धावांपर्यंत मजल मारता आली. वॉटसन आणि सुरेश रैना या दोघांचा अपवाद वगळला तर चेन्नईच्या संघात इतर एकाही फलंदाजाची जादू चालताना दिसली नाही. कारण तसे घडले असते तर चेन्नईची धावसंख्या ही किमान २२५ धावांइतकी झाली असती. मात्र चेन्नईने २०४ धावा करत राजस्थानपुढे विजयासाठी २०५ धावांचे आव्हान ठेवले.
२०५ धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. हेन्रिच आऊट झाला त्यानंतर राजस्थानचे एकापाठोपाठ एक फलंदाज बाद होत गेले. चेन्नईच्या गोलंदाजांपुढे त्यांनी अक्षरशः नांगीच टाकली बेन स्ट्रोक्सची ४५ धावांची खेळी आणि जॉस बटलरची २२ धावांची खेळी सोडली तर एकही फलंदाज २० धावाही करू शकला नाही. दीपक चहार, ब्राव्हो, शार्दुल ठाकूर आणि करण शर्मा यांना प्रत्येकी २ विकेट्स मिळाल्या. तर शेन वॉटसन आणि इम्रान ताहीर यांना प्रत्येकी १ विकेट मिळाली. या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे राजस्थानचा एकही फलंदाज टिकाव धरू शकला नाही. त्याचमुळे राजस्थान रॉयल्सचा पराभव झाला. तर चेन्नईच्या खात्यात आणखी एका विजयाची नोंद झाली.