इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) दिमाखदार घोडदौड राखणारा राजस्थान रॉयल्सचा संघ विजयाच्या हॅट्ट्रिकसाठी उत्सुक आहे. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या लढतीत त्यांचे पारडे जड मानले जात आहे.
सलामीच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादविरुद्ध पराभव पत्करणारा राजस्थानच्या संघाने त्यानंतर आपल्या कामगिरीत सुधारणा केली आहे. त्यांनी दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध १९ धावांनी विजय मिळवला, तर मातब्बर खेळाडूंचा समावेश असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुलाही त्यांनी १९ धावांनी पराभूत केले. या सामन्यात संजू सॅमसनने ४५ चेंडूंत ९२ धावांची खेळी साकारली होती. कर्णधार अजिंक्य रहाणेनेही महत्त्वाचे योगदान दिले होते. राजस्थानच्या गोलंदाजांनीही विराट कोहली आणि एबी डी’व्हिलियर्स यांचे दडपण बाळगले नाही.
घरच्या मैदानावर राजस्थानची कामगिरी चांगली होत नाही. याचप्रमाणे कोलकाताने सोमवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सला हरवून यंदाच्या हंगामातील चौथ्या सामन्यात दुसऱ्या विजयाची नोंद केली होती.
ख्रिस लिन आणि सुनील नरिन यांची आघाडीची फलंदाजी, दिनेश कार्तिक, रॉबिन उथप्पा, नितीश राणा आणि आंद्रे रसेल यांचा समावेश असलेली धडाकेबाज मधली फळी ही कोलकाताची वैशिष्टय़े आहेत. याशिवाय अनुभवी पियुष चावला आणि कुलदीप यादव यांच्यासारखे गोलंदाजसुद्धा त्यांच्याकडे आहेत. युवा विश्वचषक गाजवणारा वेगवान गोलंदाज शिवम मावी आणि मध्यमगती गोलंदाज रसेल यांच्यामुळे कोलकाच्या गोलंदाजीत वैविध्यपूर्णता आली आहे.
- सामन्याची वेळ : रात्री ८ वा.
- थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.