कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात अपयशी ठरलेल्या चेन्नईच्या रविंद्र जाडेजाने आरसीबीविरुद्धच्या सामन्यात दमदार पुनरागमन केलं. जाडेजा आणि हरभजन सिंहच्या भेदक माऱ्याने आरसीबीचा संघ १२७ धावांपर्यंत मजल मारु शकला. मात्र या सामन्यात रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर विराट कोहली त्रिफळाचीत झाल्यानंतर दोघांमध्ये झालेली नजरानजर चर्चेचा विषय बनली होती. मात्र सामना संपल्यानंतर रविंद्र जाडेजाने कोहलीची विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन न करण्यापाठीमागचं कारण सांगितलं आहे.
सामनावीराचा किताब देताना रविंद्र जाडेजाला कोहलीच्या विकेटबद्दल विचारलं असता तो म्हणाला, “तो मी टाकलेला पहिलाच चेंडू होता. त्यामुळे सेलिब्रेशन करण्यासाठी मी सज्ज नव्हतो. विराटची विकेट मिळवणं ही अवघड गोष्ट आहे. त्यामुळे पहिल्याच चेंडूवर विराटची विकेट मिळणं हा माझ्यासाठीही एक आश्चर्याचा धक्का होता.” रविंद्र जाडेजाने आपल्या बाजूने घडलेल्या प्रकाराबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे, मात्र त्याच्या या स्पष्टीकरणावर क्रिकेटप्रेमी विश्वास ठेवायला तयार नाहीयेत.
अवश्य वाचा – कोहलीची विकेट नको रे बाबा ! जडेजानं टाळलं विराटच्या विकेटचं सेलिब्रेशन
आरसीबीविरुद्धच्या सामन्यात रविंद्र जाडेजा आणि हरभजन सिंह यांनी टिच्चून मारा करत विराटच्या संघाला वेसण घातली. दोघांनीही ८ षटकांमध्ये अवघ्या ४० धावां देत आरसीबीची निम्मा संघ माघारी धाडला. बंगळुरुनं दिलेलं 128 धावांचं आव्हान चेन्नईनं 4 विकेट्सच्या मोबदल्यात 18 षटकांमध्ये पार केलं. जाडेजानं या सामन्यात 18 धावांमध्ये 3 फलंदाजांना बाद केलं. याबद्दल त्याचा सामनावीर पुरस्कारानं गौरव करण्यात आला.