आयपीएलच्या अकराव्या हंगामात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला लागलेलं पराभवाचं ग्रहण काही केल्या सुटण्याचं नाव घेत नाहीये. घरच्या मैदानावर आज विराट कोहलीच्या संघाला सलग दुसऱ्यांचा पराभवाचा सामना करावा लागला आहे. बंगळुरुने दिलेलं १७६ धावांचं आव्हान कोलकात्याने सहज पार केलं. सलामीवीर ख्रिल लीनने फटकेबाजी करत कोलकात्याच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. याही सामन्यात गोलंदाजांची निराशाजनक कामगिरी आणि गचाळ क्षेत्ररक्षण बंगळुरुच्या पराभवाचं महत्वाचं कारण ठरलं आहे.

त्याआधी  कर्णधार विराट कोहलीचं झंजावाती अर्धशतक आणि सलामीवीर क्विंटन डी-कॉक व ब्रँडन मॅक्युलम जोडीने केलेली धडाकेबाज सुरुवात या जोरावर बंगळुरुच्या संघाने घरच्या मैदानावर १७५ धावांपर्यंत मजल मारली. चिन्नास्वामी मैदानावर बंगळुरुच्या सलामीवीरांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली, मात्र दोघे फलंदाज माघारी परतल्यानंतर बंगळुरुची मधळी फळी काहीशी कोलमडली. मात्र विराट कोहलीने एका बाजूने किल्ला लढवत आपल्या संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली.

कोलकात्याकडून अँड्रे रसेलने ३ तर कुलदीप यादवने १ बळी घेतला. याआधीच्या सामन्यांमध्ये बंगळुरुच्या संघाने धावांचा डोंगर उभारुनही गोलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे त्यांना सामन्यावर पाणी सोडावं लागलं होतं. त्यामुळे आजच्या सामन्यात काही बदल घडेल अशी आशा सर्वांना होती, मात्र बंगळुरुला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे.

  • शुभमन गिलचा विजयी चौकार, कोलकाता सामन्यात ६ गडी राखून विजयी
  • १९ व्या षटकात सिराजच्या गोलंदाजीवर कार्तिक माघारी, कोलकात्याचे ४ गडी माघारी
  • कर्णधार दिनेश कार्तिकची फटकेबाजी
  • आंद्रे रसेल मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर भोपळाही न फोडता माघारी
  • नितीश राणा दुखापतीमुळे माघारी परतला
  • मात्र आश्विनच्याच गोलंदाजीवर उथप्पा माघारी, कोलकात्याचा दुसरा गडी माघारी
  • रॉबिन उथप्पा – ख्रिस लीन जोडीकडून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • मुरगन आश्विनच्या गोलंदाजीवर सुनील नरीन माघारी, कोलकात्याला पहिला धक्का
  • पावसाचा जोर थांबला, परत सामन्याला सुरुवात
  • पावसाचं आगमन झाल्याने सामना थांबवला
  • कोलकात्याने ओलांडला ५० धावसंख्येचा टप्पा
  • कोलकात्याच्या डावाची आक्रमक सुरुवात, ख्रिस लीन – सुनील नरीन जोडीची फटकेबाजी
  • कोलकात्याला विजयासाठी १७६ धावांचं आव्हान
  • २० व्या षटकापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची १७५ धावांपर्यंत मजल
  • रसेलच्या गोलंदाजीवर मनदीप सिंह माघारी, बंगळुरुला चौथा धक्का
  • विराट कोहलीचं अर्धशतक, फटकेबाजी करुन विराटकडून संघाच्या धावसंख्येत भर
  • विराट कोहली – मनदीप सिंह जोडीने बंगळुरुचा डाव सावरला
  • ठराविक अंतराने बंगळुरुचे ३ गडी माघारी, कोलकात्याचं सामन्यात पुनरागमन
  • पाठोपाठ मनन व्होरा त्रिफळाचीत, कोलकात्याच्या रेसलला एकाच षटकात २ बळी
  • ठराविक अंतराने फटकेबाजी करणारा ब्रँडन मॅक्युलम माघारी
  • पहिल्या विकेटसाठी डी-कॉक – मॅक्युलममध्ये ६७ धावांची भागीदारी
  • कुलदीप यादवने घेतला डी-कॉकचा बळी, बंगळुरुला पहिला धक्का
  • बंगळुरुची जमलेली जोडी फोडण्यात कोलकात्याला यश, क्विंटन डी-कॉक माघारी
  • दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी, कोलकात्याचे गोलंदाज हतबल
  • डी-कॉम – मॅक्युलम जोडीकडून डावाची आक्रमक सुरुवात
  • कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय