राजस्थान रॉयल्स संघाने दिलेल्या १५३ धावांचा अगदी सहजपणे पाठलाग करीत किंग्ज इलेव्हन पंजाबने १९ व्या षटकातच ६ गडी राखून दिमाखदार विजय मिळवला. पंजाबच्या या विजयाने संघाची बादफेरीतील स्थिती अधिक बळकट झाली असून राजस्थानचा पाय अजून खोलात पडला आहे.
किंग्ज इलेव्हन पंजाबच्या के. एल. राहुलला दिलेले जीवदान राजस्थानला महागात पडले. राहुलने ५४ चेंडूंमध्ये नाबाद ८४ धावांची खेळी करीत संघाला एकहाती विजय मिळवून दिला. राजस्थानच्या १५३ धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाबचा वादळी सलामीवीर ख्रिस गेल अवघ्या ८ धावा करुन माघारी परतला. त्यानंतर आलेल्या मयंक अग्रवालला पुन्हा एकदा चमक दाखवता आली नाही. त्याला बेन स्टोक्सने अवघ्या २ धावांवर तंबूत पाठवले. एकीकडे आपली चिवट खेळी खेळणाऱ्या के. एल. राहुल याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या करुण नायरसमवेत भागीदारी जमवत संघाची पायभरणी केली. अनुरितसिंगचा चेंडू नायरने आपल्याच यष्टींवर ओढून घेतल्याने तो त्रिफळाचीत झाला. दुसरीकडे सलामीवीर के.एल. राहुल याने त्याची लय कायम राखत अर्धशतकी खेळी केली.
त्याआधी प्रथम फलंदाजी करताना राजस्थानची सुरुवात डळमळीत झाली. त्यांचा एक सलामीवीर शॉर्ट अवघ्या २ धावांवर तर त्यानंतर आलेला कर्णधार अजिंक्य रहाणे हा केवळ ५ धावा काढून तंबूत परतला. त्यामुळे प्रारंभी २ बाद २५ अशी त्यांची अवस्था झाली होती. परंतु, दुसरीकडे सलामीवीर जोस बटलर याने तडाखेबंद ५१ धावा फटकावत संघाच्या डावउभारणीत महत्त्वाचे योगदान दिले. त्याला संजू सॅमसनने २८ धावा काढून तोलामोलाची साथ दिली. तर अखेरच्या षटकांमध्ये पुन्हा झटपट बळी गमावल्यानंतर गोपालने केलेल्या २४ धावांमुळे २० षटकांअखेर धावफलकावर ९ बाद १५२ धावा लागल्या.
संक्षिप्त धावफलक
राजस्थान रॉयल्स : २० षटकात ९ बाद १५२ ( जोस बटलर ५१, संजू सॅमसन २८ गोपाल २४ ; मुजीब उर रहमान ३/२७ , ए.जे.टाय २/२४ ) पराभूत विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब १८.४ षटकात ४ बाद १५५ धावा ( के. एल. राहुल नाबाद ८४ , करुण नायर ३५, स्टोइनीस नाबाद २३ ; के. गौतम १/१८, अनुरितसिंग १/२०)
- करुण नायर त्रिफळाचीत, पंजाबचा तिसरा गडी माघारी
- दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी
- करुण नायर-लोकेश राहुल जोडीकडून पंजाबचा डाव सावरण्याचा प्रयत्न
- ठराविक अंतराने मयांक अग्रवाल माघारी, पंजाबचा दुसरा गडी माघारी
- आक्रमक फलंदाज ख्रिस गेल माघारी, जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर गेल झेलबाद. पंजाबचा पहिला गडी माघारी
- पंजाबच्या सलामीवीरांची सावध सुरुवात
- पंजाबला विजयासाठी १५३ धावांचं आव्हान
- शेवटच्या षटकात श्रेयस गोपाल धावबाद, राजस्थानची १५२ धावांपर्यंत मजल
- राजस्थानने ओलांडला १५० धावांचा टप्पा
- अखेरच्या षटकांत श्रेयस गोपाल-जयदेव उनाडकटची फटकेबाजी
- ठराविक अंतराने राहुल त्रिपाठी माघारी, राजस्थानला आठवा धक्का
- कृष्णप्पा गौथम अंकित राजपूतच्या गोलंदाजीवर माघारी
- राजस्थानची घसरगुंडी सुरुच, सातवा गडी माघारी
- लागोपाठच्या चेंडूवर जोफ्रा आर्चर माघारी, राजस्थानला सहावा धक्का
- जोस बटलर माघारी, राजस्थानचा निम्मा संघ माघारी
- सीमारेषेवर मयांक अग्रवाल-मनोज तिवारीमधल्या ताळमेळामुळे स्टोक्स माघारी
- ठराविक अंतराने मुजीब उर रेहमानच्या गोलंदाजीवर बेन स्टोक्स माघारी, राजस्थानला चौथा धक्का
- अँड्रू टायच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना सॅमसन माघारी, राजस्थानचा तिसरा गडी माघारी
- राजस्थानने ओलांडला ५० धावसंख्येचा टप्पा
- संजू सॅमसन-जोस बटलर जोडीने संघाचा डाव सावरला
- अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर अजिंक्य रहाणे माघारी, राजस्थानला दुसरा धक्का
- रहाणे-जोस बटलर जोडीकडून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न
- राजस्थानचा पहिला गडी माघारी
- राजस्थानची अडखळती सुरुवात, पहिल्याच षटकात डार्सी शॉर्ट माघारी
- पंजाबने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय