दक्षिण आफ्रिकी फलंदाज फाफ डु प्लेसिसने एका बाजूने संयमी फलंदाजी करत चेन्नईच्या संघाला आयपीएलच्या अकराव्या हंगामाच्या अंतिम फेरीत आणून सोडलं आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर रंगलेल्या सामन्यात चेन्नईने सनराईजर्स हैदराबाद संघावर २ गडी राखून मात केली. हैदराबादने विजयासाठी दिलेलं १४० धावांचं आव्हान पेलवताना चेन्नईच्या फलंदाजांच्या नाकीनऊ आले होते. सिद्धार्थ कौल, भुवनेश्वर कुमार आणि राशिद खान यांनी टिच्चून मारा करत चेन्नईवर दडपण आणलं होतं. मात्र डुप्लेसिसला बाद करण्यात हैदराबादचे गोलंदाज अयशस्वी ठरले. डु प्लेसिसचा अपवाद वगळता चेन्नईचा एकही फलंदाज मैदानात तग धरु शकला नाही. अखेरच्या फळीत शार्दुल ठाकूरने १९ व्या षटकात फटकेबाजी करत डुप्लेसिसला चांगली साथ दिली.

हैदराबादकडून राशिद खानने ४ षटकात केवळ ११ धावा देत २ फलंदाजांना माघारी धाडलं. त्याला सिद्धार्थ कौल, संदिप शर्मा यांनी प्रत्येकी  २-२ तर भुवनेश्वर कुमारने १ बळी घेत चांगली साथ दिली. मात्र अखेरच्या षटकांत डुप्लेसिसवर नियंत्रण राखण्यात हैदराबादचे गोलंदाज अयशस्वी ठरले.

त्याआधी चेन्नईच्या गोलंदाजांनी टिच्चून केलेल्या माऱ्यासमोर हैदराबादचेही फलंदाज पुन्हा एकदा कोलमडले. अंतिम फेरी गाठण्यासाठी विजय मिळवणं गरजेचं असलेल्या सामन्यात हैदराबादच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या चेन्नईच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. धोनीचा हा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. दिपक चहरने पहिल्याच चेंडूवर हैदराबादच्या शिखर धवनला माघारी धाडलं. यानंतर कर्णधार केन विल्यमसनने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र विल्यमसन माघारी परतल्यानंतर हैदराबादचे फलंदाज एकामागोमाग एक माघारी परतत राहिले. वेस्ट इंडिजच्या कार्लोस ब्रेथवेटने अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या हाणामारीच्या जोरावर हैदराबादने शंभरी ओलांडून दिली. चेन्नईच्या सर्व गोलंदाजांना आजच्या सामन्यात विकेट मिळवण्यात यश आलं. ड्वेन ब्राव्होने सर्वाधिक २ बळी घेतले.

  • विजयासह चेन्नई आयपीएलच्या अकराव्या हंगामाच्या अंतिम फेरीत दाखल
  • अखेर चेन्नई सुपरकिंग्ज सामन्यात विजयी
  • डु प्लेसिस-ठाकूर जोडीकडून १९ व्या षटकात फटकेबाजी
  • चोरटी धाव घेताना हरभजन माघारी, चेन्नईचा आठवा गडी माघारी
  • चौफेर फटकेबाजी करत डु प्लेसिसचं अर्धशतक
  • फाफ डु प्लेसिसची फटकेबाजी, चेन्नईचं सामन्यात आव्हान कायम
  • संदीप शर्माच्या गोलंदाजीवर दिपक चहर माघारी, हैदराबादचे ७ गडी माघारी
  • चेन्नईचे ६ गडी बाद, हैदराबादच्या गोलंदाजांचा टिच्चून मारा
  • ठराविक अंतराने संदीप शर्माच्या गोलंदाजीवर रविंद्र जाडेजा माघारी
  • राशिद खानच्या गोलंदाजीवर ब्राव्हो माघारी, चेन्नईचा निम्मा संघ माघारी
  • ब्राव्हो-डु प्लेसिस जोडीकडून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • राशिद खानच्या गोलंदाजीवर धोनी त्रिफळाचीत, चेन्नईला चौथा धक्का
  • धोनी-डु प्लेसिस जोडीकडून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • लागोपाठच्या चेंडूवर अंबाती रायडू त्रिफळाचीत, चेन्नईचा तिसरा गडी माघारी
  • सिद्धार्थ कौलने उडवला रैनाचा त्रिफळा, चेन्नईचा दुसरा गडी माघारी
  • सुरेश रैनाची फटकेबाजी, संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • हैदराबादप्रामाणे चेन्नईची अडखळती सुरुवात, शेन वॉटसन भोपळाही न फोडता माघारी
  • २० षटकात हैदराबादची १३९ धावांपर्यंत मजल, चेन्नईला विजयासाठी १४० धावांचं आव्हान
  • अखेरच्या चेंडूवर हैदराबादचा भुवनेश्वर कुमार धावबाद, हैदराबादचा सातवा गडी माघारी
  • अखेरच्या क्षणांमध्ये कार्लोस ब्रेथवेटची फटकेबाजी, हैदराबादले ओलांडला शंभर धावांचा टप्पा
  • ब्राव्होच्या गोलंदाजीवर पठाण बाद, हैदराबादला सहावा धक्का
  • हैदराबादच्या फलंदाजांची निराशाजनक कामगिरी सुरुच, युसूफ पठाण माघारी
  • मनिष पांडेला स्वतःच्या गोलंदाजीवर माघारी धाडत जाडेजाचा हैदराबादला पाचवा धक्का
  • ब्राव्होच्या गोलंदाजीवर शाकीब अल हसन माघारी, हैदराबादची घसरगुंडी सुरुच
  • शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर केन विल्यमसन माघारी, हैदराबादचा संघ संकटात
  • लुंगी एन्गिडीच्या गोलंदाजीवर गोस्वामी माघारी, हैदराबादचा दुसरा गडी बाद
  • केन विल्यमसन-श्रीवत्स गोस्वामी जोडीकडून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • शिखर धवन पहिल्याच चेंडूवर माघारी, दिपक चहरने उडवला त्रिफळा
  • चेन्नईने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

Story img Loader