आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा पाच धावांनी पराभव करत गुणतालिकेतील पहिले स्थान कायम राखले आहे. तर या पराभवामुळे बंगळुरुचे आयपीएलमधील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.
आयपीएलमध्ये सोमवारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु हा सामना पार पडला. मोहम्मद सिराज आणि टीम साऊदी यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर बंगळुरुच्या संघाने हैदराबादला १४६ धावांवर रोखण्याची करामत केली. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या विराट कोहलीचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. सुरुवातीच्या षटकापासून भेदक मारा करत बंगळुरुच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या फलंदाजांना वेसण घातली. हैदराबादकडून केन विल्यमसन आणि शाकीब अल हसनचा अपवाद वगळता उर्वरित फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही.
बंगळुरुकडून साऊदी आणि सिराजने प्रत्येकी ३-३ बळी घेतले, त्याला उमेश यादव-युजवेंद्र चहलने १-१ बळी घेत चांगली साथ दिली. आतापर्यंत हैदराबादच्या संघाने ३ सामने सर्वोत्तम गोलंदाजीच्या जोरावर जिंकले आहेत. बंगळुरुविरोधातही हैदराबादला गोलंदाजांनीच तारले. बंगळुरुची सलामीची जोडी २४ धावांवर फोडण्यात हैदराबादला यश आले. यानंतर कर्णधार विराट कोहलीने ३९ धावांची खेळी करत संघाचा धाव पुढे नेला. मात्र, त्याला अपेक्षित साथ मिळाली नाही. हैदराबादच्या संदीप शर्मा आणि भुवनेश्वर कुमारच्या भेदक माऱ्याने बंगळुरुच्या फलंदाजांवर लगाम लावला. दोघांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली, तर शाकीब अल हसनने ३६ धावांमध्ये दोन विकेट घेतल्या.
- बंगळुरुचा पराभव, भुवनेश्वर कुमारच्या भेदक माऱ्यामुळे हैदरबादचा विजय
- बंगळुरुला पाचवा धक्का.
- राशिद खानच्या गोलंदाजीवर विराट त्रिफळाचीत, बंगळुरुला चौथा गडी माघारी
- लागोपाठ विराट कोहली माघारी, बंगळुरुला तिसरा धक्का
- मनन व्होरा माघारी, बंगळुरुचा दुसरा गडी माघारी
- विराट कोहली-मनन व्होराकडून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न
- बंगळुरुने ओलांडला ५० धावांचा टप्पा
- शाकीब अल हसनच्या गोलंदाजीवर पार्थिव पटेल माघारी, बंगळुरुला पहिला धक्का
- बंगळुरुची सावध सुरुवात, पार्थिव पटेलची फटकेबाजी
- बंगळुरुला विजयासाठी १४७ धावांचं आव्हान
- अखेरच्या चेंडूवर संदीप शर्मा माघारी, २० षटकांत हैदराबादची १४६ धावांपर्यंत मजल
- विल्यमसन, शाकीब अल हसन, युसूफ पठाण, वृद्धीमान साहा, राशिद खान, सिद्धार्थ कौल माघारी
- ठराविक अंतराने हैदराबादचे गडी माघारी जाण्यास सुरुवात
- विल्यमसनचं अर्धशतक, संघाने ओलांडला १०० धावांचा टप्पा
- केन विल्यमसन-शाकीब अल हसन जोडीने संघाचा डाव सावरला
- युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर मनिष पांडे माघारी, हैदराबादचा तिसरा गडी माघारी
- मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर शिखर धवन माघारी, हैदराबादचा दुसरा गडी माघारी
- शिखर धवन-केन विल्यमसन जोडीकडून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न
- टीम साऊदीचा हैदराबादला पहिला धक्का, अॅलेक्स हेल्स त्रिफळाचीत
- हैदराबादच्या सलामीवीरांकडून डावाची सावध सुरुवात
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय