हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळवण्यात आलेल्या, मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद सामन्यात हैदराबादने बाजी मारली. अतिशय अटीतटीच्या झालेल्या सामन्यात अखेरच्या षटकात हैदराबादने या सामन्यामध्ये बाजी मारली. मात्र टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, दोन्ही संघातील खेळाडूंना कालच्या सामन्यादरम्यान डासांचा चांगलाच त्रास झाला.
मैदानातील ड्रेसिंग रुमची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्याने ड्रेसिंग रुममध्ये केमिकल सदृष्य स्प्रे फवारला. या स्प्रेचा वास इतका भयानक होता की खेळाडूंना वास घेताना त्रास जाणवायला लागला. एका खेळाडूने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना ही माहिती दिली आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून या मैदानावर सामने खेळवले जात आहेत.
दोन्ही संघातील खेळाडूंनी यावेळी मैदानाच्या दुरावस्थेबद्दल आपली नाराजी व्यक्त केली. ड्रेसिंग रुमसोबत मैदानातल्या शौचालयांची परिस्थीतीही फारशी चांगली नसल्याचा सूर यावेळी खेळाडूंनी लावला. आगामी सामन्यांपर्यंत ही परिस्थिती सुधारली नाही तर खेळाडूंना मलेरिया सारख्या रोगांचा सामना करला लागेल, असं मत मुंबई इंडियन्स संघातल्या एका खेळाडूने व्यक्त केलं. हैदराबादच्या संघातील काही खेळाडू तर चक्क हातात डास मारण्याच्या इलेट्रॉनिक रॅकेट घेत डास मारताना दिसले होते.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मैदानावर ड्रेसिंग रुमची असणारी ही परिस्थिती असणं नक्कीच चांगली गोष्ट नाहीये. त्यामुळे खेळाडूंनी व्यक्त केलेल्या नाराजीनंतर, संबंधित यंत्रणा याकडे लक्ष देतील अशी अपेक्षा आहे.
अवश्य वाचा – IPL 2018 : हैदराबादी बिर्याणी मुंबई वडापाववर पडली भारी, अखेरच्या चेंडूवर जिंकला सामना