दहाव्या हंगामाचं विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सची यंदाच्या हंगामात फारशी चांगली सुरुवात झाली नाही. सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये लागोपाठ पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर, मुंबईने काही सामन्यांमध्ये विजय मिळवला….मात्र तोपर्यंत प्ले-ऑफच्या सामन्यांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठीच्या मुंबईच्या मार्गात अनेक अडथळे निर्माण झाले होते. सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्सने प्ले-ऑफच्या सामन्यांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी सर्व सामने मोठ्या फरकाने जिंकण गरजेचं आहे. याचसोबत इतर संघांच्या निकालावरही मुंबईचा प्ले-ऑफच्या सामन्यांमधला प्रवेश अवलंबून ठरणार आहे.

सध्याच्या खडतर परिस्थितीतही मुंबईचे महत्वाचे ५ खेळाडू आपल्या संघाला प्ले-ऑफच्या सामन्यांचं तिकीट मिळवून देऊ शकतात.

१) रोहित शर्मा


अकराव्या हंगामात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाव्या तशा फॉर्मात आलेला नाहीये. मात्र ज्या सामन्यांमध्ये रोहितने आक्रमक अर्धशतकी खेळी केल्या आहेत, त्या सामन्यांमध्ये मुंबईने विजय मिळवला आहे. रोहितच्या खेळीमुळे संघातील इतर फलंदाजांना आत्मविश्वास मिळतो, यासाठी रोहित शर्माचं फॉर्मात येणं आणि कामगिरीत सातत्य राखणं अत्यंत गरजेचं आहे.

 

२) हार्दिक पांड्या –


मुंबईच्या संघातला अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पांड्याची ओळख आहे. कोलकात्याविरुद्ध घरच्या मैदानात झालेल्या सामन्यात हार्दिकच्या गोलंदाजी आणि फलंदाजीतील चमकदार कामगिरीमुळे मुंबईने विजय मिळवला होता. गोलंदाजीत सध्या हार्दिक सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत आहे. त्यामुळे उरलेल्या सामन्यांमध्ये अखेरच्या षटकांमध्ये हार्दिक पांड्याने सर्वोत्तम कामगिरी करणं संघाला अपेक्षित आहे.

फलंदाजीतही मधल्या फळीत हार्दिक पांड्यावर मोठी जबाबदारी आहे. सलामीचे फलंदाज अपयशी ठरल्यास मधल्या फळीत हार्दिक पांड्याने आक्रमक फलंदाजी करुन संघाचा डाव सावरण्याची अपेक्षा संघाला असणार आहे.

 

३) कृणाल पांड्या –


राईट टू मॅच कार्डाद्वारे लिलावात मुंबईच्या संघाने कृणाल पांड्याला आपल्या संघात कायम राखलं होतं. गेल्या काही वर्षांमध्ये कृणाल पांड्या मुंबईच्या संघासाठी ट्रम्प कार्ड ठरला आहे. आपल्या कामचलाऊ फिरकी गोलंदाजीने महत्वाचे बळी मिळवण्याची क्षमता कृणालकडे आहे. आतापर्यंत अनेकदा त्याने मैदानात हे सिद्ध केले आहे. याचसोबत फलंदाजीमध्येही मधल्या फळीत मोठे फटके खेळण्याची क्षमता कृणालकडे आहे. यंदाच्या हंगामात कृणाल पांड्याच्या नावावर १८१ धावा आणि ९ बळी जमा आहेत. त्यामुळे उरलेल्या सामन्यांमध्ये कृणालने अशीच अष्टपैलू कामगिरी केल्यास मुंबईचा संघ प्ले-ऑफच्या सामन्यांमध्ये दाखल होऊ शकतो.

 

४) सूर्यकुमार यादव


अकराव्या हंगामात आपल्या घरच्या संघाकडून खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवने फलंदाजीत आपला करिष्मा दाखवला आहे. सूर्यकुमार यादवच्या येण्याने मुंबईची फलंदाजी अधिक मजबूत झालेली आहे. मात्र सलामीला एविन लुईसकडून त्याला चांगली साथ मिळणं गरजेचं आहे. दोन्ही फलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये आक्रमक फटकेबाजी केल्यास फलंदाजीत मुंबईची सुरुवात चांगली होऊ शकते.

 

५) मयांक मार्कंडे –


यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्यापासूनच मयांक मार्कंडेच्या फिरकी गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना अवाक करुन सोडलं आहे. अंतिम ११ जणांच्या संघात मयांकला स्थान देण्याचा मुंबई संघ व्यवस्थापनाचा निर्णय चांगलाच फळाला आला आहे. आपल्या लेगस्पिन गोलंदाजीने मयांकने आतापर्यंत अनेक फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवलं आहे. मयांक यंदाच्या हंगामात सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत आपलं स्थान टिकवून आहे. त्यामुळे मयांकच्या कामगिरीकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

Story img Loader