भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंचं फॅनफॉलोइंग आपल्याला माहितीच आहे. विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी, सचिन तेंडूलकर यांच्यासारख्या अनेक क्रिकेटपटूंना देशाच्या कानाकोपऱ्यात असे चाहते भेटत असतात. सध्या सुरु असलेल्या आयपीएलच्या अकराव्या हंगामात, महेंद्रसिंह धोनीला पाया पडण्यासाठी चाहत्यांनी थेट मैदानात धाव घेतल्याचा प्रकार दोन वेळा घडला. मात्र आता भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीलाही आपल्या अशाच एका चाहत्याचा सामना करावा लागला आहे.
दिल्ली डेअरडेविल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात फिरोजशहा कोटला मैदानात सुरु असलेल्या सामन्यात, विराटच्या चाहत्याने मैदानातील सुरक्षेचं कड भेदून थेट खेळपट्टीकडे धाव घेतली. पाचव्या षटकात फलंदाजीदरम्यान विराट कोहली नॉन स्ट्राईकिंग एंडला उभा होता. यावेळी विराटप्रेमी चाहत्याने विराटच्या पायांना स्पर्श करत, आपल्या प्रेमाचं दर्शन सर्व जगाला घडवलं. यानंतर विराटच्या चाहत्याने आपला मोबाईल काढून विराटसोबत सेल्फीही काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत मैदानाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला खेळपट्टीवरुन बाहेर काढलं होतं. या प्रसंगामुळे विराट कोहलीही थक्क झालेला पहायला मिळाला.
या सामन्यात विजयासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला विजयासाठी १८१ धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. दिल्लीच्या गोलंदाजीचा सामना करत विराट कोहली आणि एबी डिव्हीलियर्स यांनी शतकी भागीदारी रचत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात विराटने झुंजार अर्धशतकी खेळी केली. मात्र सामन्यानंतरही विराटच्या या आगळ्यावेगळ्या चाहत्याची चर्चा क्रीडाप्रेमींमध्ये रंगली होती.