२०१८ च्या आयपीएल हंगामामध्ये पहिला सामना जिंकत चेन्नई सुपरकिंग्जने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यानंतर बुधवारी कोलकाता विरुद्ध राजस्थान हा सामना इडन गार्डन्स मैदानावर रंगणार आहे. या सामन्यातील विजेत्या संघाला हैदराबादविरुद्ध पुन्हा एक सामना खेळावा लागणार आहे, सो संघ या सामन्यात विजयी होईल त्यालाच अंतिम फेरीतं तिकीट मिळणार आहे. मात्र कोलकाता विरुद्ध राजस्थान या एलिमनेटर सामन्यावर पावसाचं सावट निर्माण झालेलं आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, रात्री १० वाजता कोलकात्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचसोबत दुपारच्या दरम्यानही कोलकात्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. बीसीसीआयने आखलेल्या वेळापत्रकात एलिमनेटर सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाहीये. त्यामुळे पावसाने आजच्या सामन्यात व्यत्यय आणून सामना रद्द झाल्यास कोलकात्याच्या संघाला फायदा होऊ शकतो. सरस धावगतीच्या आधारावर कोलकात्याचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर होता, त्यामुळे राजस्थानचा प्रवास संपुष्टात येऊ शकतो. यानंतर कोलकात्याला हैदराबादशी पुन्हा एकदा लढावं लागणार आहे.

साखळी फेरीत राजस्थानला अखेरच्या सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून देणारा जोस बटलर मायदेशी रवाना झाला आहे. याचसोबत बेन स्टोक्स देखील राजस्थानसाठी उपलब्ध नाहीये. त्यामुळे आजचा सामना जिंकण्यासाठी राजस्थानच्या संघासमोर मोठं आव्हान असणार आहे. कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानात हा सामना रंगणार असल्यामुळे कोलत्याचं पारडं या सामन्यात जड मानलं जातंय. त्यामुळे आजच्या सामन्यात कोण बाजी मारतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader