आयपीएलचा अकरावा हंगाम आता उत्तरार्धाकडे सरकत चाललेला असला, तरीही प्ले-ऑफच्या शर्यतीत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरच्या संघाबद्दल निर्णय झालेला नाहीये. कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्स हे तीन संघ तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी लढत आहेत. राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या दोन संघांची खराब धावगतीमुळे प्ले-ऑफच्या शर्यतीत स्थान मिळवण्याची शक्यता जवळपास दुरापास्त आहे. दिल्ली डेअरडेविल्सचा संघ याआधीच स्पर्धेबाहेर गेलेला आहे, त्यामुळे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर कोण बाजी मारेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्स या तीन संघांसाठी आता प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी नेमकं काय गणित आहेत, हे पाहूयात.

१) कोलकाता नाईट रायडर्स –

सध्या कोलकाता नाईट रायडर्सचा संघ १४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर असणार आहे. राजस्थानविरुद्ध विजयानंतर कोलकात्याला आपल्या पुढच्या सामन्यात सनराईजर्स हैदराबाद संघाला हरवायचं आहे. असं करण्यास कोलकात्याचा संघ यशस्वी झाला, तर प्ले-ऑफच्या शर्यतीत कोलकात्याला धावगतीवर अवलंबून रहावं लागणार नाही.

२) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु –

अकराव्या हंगामाच्या उत्तरार्धात सूर सापडलेल्या बंगळुरुन प्ले-ऑफच्या शर्यतीत आपलं आव्हान टिकवून ठेवलं आहे. ०.२६ च्या धावगतीने बंगळुरु सध्या १२ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. यापुढील सामन्यांमध्ये बंगळुरुचा संघ विजयी झाल्यास, मुंबईच्या संघाला याचा धक्का बसू शकतो. मात्र मुंबईने आपल्या पुढच्या सामन्यात विजय मिळवल्यास बंगळुरुसाठी चिंतेचं वातावरण निर्माण होईल. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात बंगळुरुला मोठ्या फरकाने विजय मिळवणं अनिवार्य आहे, असं झाल्यास बंगळुरुचा संघ प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवू शकतो.

१) मुंबई इंडियन्स –

दहाव्या हंगामाचं विजेतेपद मिळवलेल्या मुंबईची यंदाच्या हंगामात अस्थिर सुरुवात झाली. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये पराभवाचा धक्का सहन करावा लागलेला मुंबईचा संघ नंतर विजयी पथावर परत आला. मात्र बंगळुरु आणि राजस्थानविरुद्धच्या खराब खेळींमुळे मुंबईचं गणित पुन्हा एकदा फिस्कटलं. सध्या ०.३८ धावगती आणि १२ गुणांसह चौथ्या स्थानावर असलेल्या मुंबईला पुढच्या सामन्यात विजय मिळवणं गरजेचं आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास मुंबईचा संघ प्ले-ऑफमध्ये दाखल होईल.

Story img Loader