आयपीएलचा अकरावा हंगाम किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघासाठी आतापर्यंत चांगला गेलेला आहे. लोकेश राहुल, ख्रिस गेल यांच्यासारखे फलंदाज आणि रविचंद्रन आश्विनच्या नेतृत्वाखाली खेळणारा पंजाबचा संघ यंदा एका वेगळ्याच फॉर्ममध्ये दिसतो आहे. सध्या पंजाबच्या संघाने सर्वोत्तम चार संघांमधलं आपलं स्थान कायम राखलं आहे. संघ मालकीण प्रिती झिंटाही आपल्या खेळाडूंच्या कामगिरीवर भलतीच खुश आहे. पंजाबच्या संघाने आयपीएलचा अकरावा हंगाम जिंकल्यास, प्रितीने खेळाडूंना एका खास बक्षिसाचं आश्वासन देत, ‘तुमच्यासाठी कायपण’ असा संदेश दिला आहे.
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सामना जिंकल्यानंतर, इडन गार्डन्स मैदानात लोकेश राहुलशी संवाद साधताना प्रिती झिंटाने ही घोषणा केली आहे. “तुम्ही आयपीएल २०१८ चं विजेतेपद मिळवलंत तर मी तुमच्यासाठी एक खास गोष्ट करेन. ती गोष्ट नेमकी काय असेल हे मी आता सांगू शकणार नाही, मात्र त्यासाठी तुम्हाला सर्वोत्तम खेळ करणं चालू ठेवावं लागणार आहे.” प्रितीने आपली बाजू स्पष्ट केली.
२०१४ साली झालेल्या आयपीएलच्या अंतिम फेरीत, पंजाबच्या संघांने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र कोलकाता नाईट रायडर्सविरोधात त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. आज पंजाबचा सामना दिल्ली डेअरडेविल्सविरुद्ध होणार आहे, त्यामुळे पंबाजच्या खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांची नजर असणार आहे.