चेन्नई सुपरकिंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्सच्या सामन्यावर एक संकट येऊन उभे ठाकले आहे. हे संकट आहे चक्क सापांचे. चेन्नई सुपरकिंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघातला सामना आज एम. ए. चिदंबरम स्टेडियमध्ये खेळवण्यात येणार आहे. मात्र या सामन्याला विरोध दर्शवत, हा सामना झाला तर आम्ही मैदानात साप सोडू आणि खेळाडूंची पळता भुई थोडी करू असा इशाराच तामिझगा वझुवुरुमाई काची (टीव्हिके) या संघटनेने दिला आहे. या संघटनेचे मुख्य वेलुमुरुगन यांनी या आंदोलनासंदर्भातली माहिती प्रसारमाध्यमांना सांगितली. सध्याही हे आंदोलन सुरु असून पोलिसांचा आणि सैन्यदलाचा ताफा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे.
Chennai: Protest by various groups outside MA Chidambaram Stadium in Chepauk, intensifies. They are agitating against #CSKvsKKR IPL match to be held at 8 pm. Heavy Police force deployed. #CauveryManagementBoard. pic.twitter.com/eFcOIfhcAt
— ANI (@ANI) April 10, 2018
मंगळवारी रात्री ८ वाजता चेन्नई आणि कोलकाता या दोन संघांमध्ये आयपीएलचा सामना रंगतो आहे. या दोघांनीही सामना जिंकण्यासाठी कसून तयारी केली आहे. अशात चेन्नई आणि कोलकाता यांच्या सामन्याला TVK या संघटनेने कडाडून विरोध दर्शवला आहे, तसेच साप सोडून आम्ही खेळाडूंचा सामना होऊच देणार नाही अशी भूमिका या संघटनेने घेतली आहे. हा सामना होऊ नये म्हणून या संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी मैदानाबाहेरही आंदोलन केले. कावेरीच्या पाण्यावरून हा सगळा वाद पेटला आहे. कावेरीच्या पाणी वाटपात भेदभाव केल्याचा आरोप करत चेन्नई येथील मैदानाबाहेर जोरदार निदर्शने सुरु करण्यात आली आहेत.
कोलकाता आणि चेन्नई या संघांमध्ये सामना जाहीर झाला तेव्हापासूनच टीव्हीकेने या सामन्याला विरोध दर्शवला आहे. तसेच मैदानाबाहेरही घोषणाबाजी केली आहे. अशातच आता सामना खेळवला गेला तर आम्ही मैदानात साप सोडू असा इशाराच या संघटनेने दिला आहे. कावेरीच्या पाणी वाटपात सरकारने भेदभाव केल्याचा आरोप टीव्हीकेने केला आहे. त्याचाच निषेध करत हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.