आयपीएलमध्ये यष्टीरक्षक आणि फलंदाज अशा दोन्ही भूमिका उत्तम निभावणाऱ्या दिल्लीच्या ऋषभ पंतने भारतीय संघातील स्थानापेक्षा मला सध्या आयपीएल अधिक महत्वाचे वाटते, असे विधान केल्यामुळे क्रिकेटरसिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बुधवारी झालेल्या सामन्यानंतर ऋषभला भारतीय संघात स्थान मिळेल का? असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी भारतीय संघात माझी निवड होईल की नाही यापेक्षा सध्या मला माझी आयपीएलमधील कामगिरी महत्वाची वाटते, असे विधान त्याने केले. ऋषभ पंत सध्या चांगल्या लयीत असून दिल्ली संघाच्या यशात त्याचा महत्वाचा वाटा आहे. असे असताना, सध्या मला आयपीएल जास्त महत्वाचे वाटते आहे, असे ऋषभ म्हणाला आहे.

ऋषभ पंतने आयपीएलच्या यंदाच्या मोसमात उल्लेखनीय कामगिरी करत ३ अर्धशतके झळकावली आहेत. तर दोन वेळा त्याचे अर्धशतक केवळ काही धावांनी हुकले आहे. बुधवारी राजस्थानच्या संघाशी झालेल्या सामन्यात ऋषभने २९ चेंडूत ६९ धावा केल्या. हा सामना दिल्लीने ४ धावांनी जिंकला. या सामन्याच्या नंतर त्याला भारतीय संघातील स्थान मिळवण्यासाठी आयपीएलमधील कामगिरी उपयुक्त ठरेल का? असा प्रश्न विचारण्यात आला.

या प्रश्नाचे उत्तर देताना ऋषभ म्हणाला की मी सध्या भारतीय संघातील स्थानाचा विचार करत नाही. मी आता आयपीएल खेळत आहे आणि या सामन्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणे हे माझे ध्येय आहे. मी माझ्या चुकांतून शिकत आहेआणि त्याचाशी मला आणि माझ्या संघाला फायदा झाला आहे. राजस्थानावर मिळवलेल्या विजयानंतर दिल्लीच्या संघाने आठव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यामुळे दिल्लीच्या प्ले ऑफ साठी पात्र ठरण्याच्या अपेक्षा अधिक उंचावल्या आहेत.

दिल्लीच्या संघाची कामगिरी हळूहळू सुधारत आहे. आमच्या संघाकडून ज्या चुका प्रत्येक सामन्यांत होत होत्या, त्या टाळण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही फलंदाजी उत्तम करत होतो. मात्र काही छोट्या चुका केल्याने आम्हाला पराभूत व्हावे लागत होते. त्या चुका आता कमी झाल्यामुळे आमची कामगिरी चांगली होत आहे, असेही ऋषभ पंत म्हणाला.

Story img Loader