इंडियन प्रीमियर लीगसाठी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लिलाव प्रक्रिया पार पडली होती. यात इशान किशनवर मुंबईने चक्क ६. २ कोटी रुपयांची बोली लावून त्याला संघात घेतले. एप्रिलमध्ये आयपीएल सुरु झाल्यापासून १० सामन्यांमध्ये तीन वेळा शून्यावर बाद झाल्याने त्याच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित झाले. इशान ६. २ कोटी रुपयांसाठी पात्र होता का, असा सवालही काही मंडळींनी उपस्थित केला. पण या सर्वांना बुधवारी इशानने त्याच्या बॅटने चोख प्रत्युत्तर दिले.

तीन दिवसांपूर्वी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या सामन्यात इशानच्या अगोदर पंड्या बंधू आणि जे पी ड्यूमिनी यांना फलंदाजीला पाठवण्यात आले. त्यामुळे इशानला संधी मिळालीच नाही. मात्र, बुधवारी इशानला चौथ्या स्थानावर पाठवण्यात आणि या संधीचा इशानने पुरेपुर फायदा घेतला.  इशान मैदानात आला त्यावेळी मुंबईची स्थिती ९ षटकांमध्ये २ बाद ६२ धावा अशी होती. पण इशान आज स्वतःची क्षमता सिद्ध करण्याच्या इराद्याने मैदानात उतरला. पुढची ३० मिनिटे आणि ३४ चेंडू मैदानात कोलकात्याच्या गोलंदाजांची अक्षरश: धुलाई सुरु होती. इशानने २१ चेंडूत ६२ धावांची खेळी केली. यात ५ चौकार आणि सहा षटकारांचा समावेश होता. इशानने रोहितच्या साथीने ८२ धावांची भागीदारी केली. यात रोहितचे योगदान फक्त १८ धावांचे होते. ही आकडेवारी इशानची क्षमता सिद्ध करण्यासाठी पुरेशी असल्याचे आता सांगितले जाते.

पियूष चावला आणि कुलदीप यादव या दोघांची तर त्याने धुलाईच केली. सातवा षटकार मारताना किशनचा अंदाज चुकला आणि रॉबिन उथप्पाने त्याचा झेल टिपला. पण इशान माघारी परतत असताना संघाच्या खात्यात ५.४ षटकांत ८२ धावा जमा झाल्या होत्या. इशानने त्याची छाप पाडलीच पण संघाच्या विजयाचा पाया देखील भक्कम करुन दिला.  किशनने अवघ्या १७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. हे यंदाच्या स्पर्धेतील तिसरे वेगवान अर्धशतक ठरले. लोकेश राहुलने १४ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. तर सुनील नरेनने १७ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. आता सुनील आणि इशान संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. तर, मुंबईसाठी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याच्या विक्रमाशी किशनने बरोबरी केली.

२०१६ – १७ मध्ये झारखंडचा यष्टीरक्षक- फलंदाज इशान किशनने रणजीत दिल्लीविरोधात २७२ धावांची खेळी केली होती. यात १४ षटकारांचा समावेश होता. भारताला एक उत्तम यष्टीरक्षक आणि फलंदाज गवसल्याची चर्चा त्यावेळी देखील झाली होती. विशेष म्हणजे इशान देखील धोनी ज्या राज्यातून खेळतो त्याच राज्याचे प्रतिनिधीत्व करतो. त्यामुळे हा योगायोग इशानच्या पथ्यावर पडतो. टीम इंडियातील धोनीचा वारसदार म्हणून त्याची चर्चा नेहमीच होत असते.

अंडर १९ वर्ल्डकपमध्ये त्याने संघाची धूरा सांभाळली आहे. मात्र, त्या विश्वचषकातही त्याला फलंदाजीने छाप पाडता आली नव्हती. आता आयपीएलने आगामी सामन्यांमध्ये कामगिरीत सातत्य राखले तर त्याच्यासाठी टीम इंडियाचे दार उघडतील, अशी आशा क्रिकेटप्रेमी व्यक्त करत आहे.

हा खेळ आकड्यांचा
इशानची यंदाच्या आयपीएलमधील कामगिरी
सामने – ११
धावा – २३८
स्ट्राईक रेट – १६०. ८१
सरासरी- २६. ४४
सर्वोच्च धावसंख्या – ६२
शतक/अर्धशतक- ०/२

इशानची टी-२० तील कामगिरी
सामने -५२
धावा – ११५७
स्ट्राईक रेट – १३०. २९
सरासरी – २३.६१
सर्वोच्च धावा- ६७
शतक/अर्धशतक- ०/६

झेल/यष्टीचीत-  २६/६

इशानची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कामगिरी
सामने – ३२
धावा – २०९७
सर्वोच्च धावा – २७३
सरासरी – ४१. ११
स्ट्राईक रेट – ६७. १२
शतक/अर्धशतक – ४/११

झेल/यष्टीचीत- ५८/९

Story img Loader