आयपीएलमध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यात दिल्लीच्या ऋषभ पंतने हैदराबादविरुद्ध खेळताना शतक ठोकले. ६३ चेंडूत त्याने नाबाद १२८ धावा केल्या. भारतीय खेळाडूने आयपीएलमध्ये केलेली ही सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या ठरली. ऋषभने उत्तम खेळी करूनही हा सामना दिल्लीला गमवावा लागला. पण ऋषभच्या खेळीचे सर्व स्तरांतून कौतुक झाले.

मिस ऑस्ट्रेलिया स्पर्धेची विजेती असलेली एरिन हॉलंड ही तर त्याच्या खेळीवर फिदा झाली. तिने ट्विट करून ऋषभचे कौतुक केले. ऑस्ट्रेलियामध्ये त्यावेळी रात्रीचे अडीच वाजले होते. याबाबत तिने ट्विट केले. ‘ऋषभने सुंदर फलंदाजी केली. मी केवळ त्याची फलंदाजी पाहण्यासाठी जागी राहिले. आयपीएलमध्ये यंदाच्या हंगामात भारतीयाने केलेले हे पहिले शतक आहे. ऋषभची प्रतिभा अफाट आहे..’ असे ट्विट तिने केले.

एरिकबाबत अधिक माहिती म्हणजे ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज आणि सध्या मुंबईच्या संघाकडून खेळणारा बेन कटिंग याची ती प्रेयसी आहे. असे असूनही ऋषभची तिने उघडपणे स्तुती केल्याने या ट्विटची सर्वत्र चर्चा आहे. एरीकने आयपीएलमध्ये सूत्रसंचलनही केले आहे.

दरम्यान, या शतकाबरोबरच ऋषभ यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. त्याच्या ११ सामन्यात ५२१ धावा आहेत.

Story img Loader