किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध रविवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली. ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये एमएस धोनी सर्वाधिक झेल घेणारा विकेटकीपर बनला आहे. धोनीने श्रीलंकेच्या कुमार संगकाराला मागे टाकले. ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये कुमार संगकाराच्या नावावर विकेटकिपर म्हणून सर्वाधिक १४२ झेल होते.
कुमार संगकारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. रविवारी पुण्याच्या स्टेडियमवर किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामना झाला. यावेळी प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबच्या ख्रिस गेल, मनोज तिवारी आणि आर.अश्विन यांचे झेल धोनीने घेतले. धोनीने १४४ झेल घेतले आहेत. सध्या धोनीच्या नावावर असलेला हा विक्रम लवकरच दिनेश कार्तिककडून मोडला जाऊ शकतो. दिनेश कार्तिकने यष्टीपाठी आतापर्यंत १३९ झेल घेतले आहेत.
रविवारच्या सामन्यात चेन्नईने पंजाबवर पाच विकेट राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने १९.३ षटकांत सर्वबाद १५३ धावा केल्या. मनोज तिवारी व डेव्हिड मिलर यांनीही त्यामध्ये वाटा उचलला. विजयासाठी १५४ धावांचे लक्ष्य चेन्नईने १९.१ षटकांत व पाच गडयांच्या मोबदल्यात पार केले. त्यामध्ये रैनाच्या नाबाद ६१ धावा तसेच दीपक चहारने केलेल्या झंझावती ३९ धावांचा सिंहाचा वाटा होता.प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी या सामन्यात पंजाबला ५३ धावांनी विजय मिळवणे आवश्यक होते.