आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये महेंद्रसिह धोनी भन्नाट फॉर्ममध्ये असून त्याने चेन्नई सुपर किंग्जच्या विजयामध्ये महत्वपूर्ण योगदान दिले आहे. धोनीच्या वयाचा मुद्दा उपस्थित करुन त्याच्या क्षमतेबद्दल शंका घेणाऱ्या सर्वच टीकाकारांची तोंडे धोनीने आपल्या कामगिरीने बंद करुन टाकली आहेत. प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवर तुटून पडणाऱ्या धोनीने या सीझनमध्ये सर्वाधिक षटकारांची बरसात केली आहे.
धोनीने नऊ डावात आतापर्यंत २४ षटकार ठोकले आहेत. त्याने ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स आणि आंद्रे रसेल यांना मागे टाकले आहे. या सीझनमध्ये या तिघांच्या नावावर प्रत्येकी २३ षटकार आहेत. मागच्या काही वर्षात ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये धोनीची फारशी चमकदार कामगिरी दिसली नव्हती. पण या सीझनमध्ये धोनीने आपल्या परफॉर्मन्सने सर्वांनाच थक्क करुन सोडले आहे.
कालच्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात धोनी १२ व्या षटकात फलंदाजीला आला. त्याने २५ चेंडूत नाबाद ४३ धावांची खेळी केली. यात एक चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता.
चाहता एम. एस. धोनीच्या पाया पडला
आयपीएलच्या स्पर्धेत गुरुवारी रंगलेल्या सामन्यात एका चाहत्याने चटकन येऊन महेंद्र सिंग धोनीचे पाय धरले. धोनीच्या पायाला स्पर्श करून त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. इडन गार्डन्स मैदानावर चेन्नई सुपरकिंग्ज आणि कोलकाता नाइट राइडर्स या दोन संघांमध्ये आयपीएलचा सामना रंगला. या सामन्यात कोलकाता टीमचा विजय झाला असला तरीही धोनीच्या पाया पडण्यासाठी आलेल्या या चाहत्याच्या व्हिडिओची चांगलीच चर्चा झाली.