रविवारी दिल्लीने मुंबईच्या संघाला पराभूत केले आणि दोन्ही संघ हातात हात घालून स्पर्धेबाहेर गेले. या पराभवामुळे मुंबईचे स्पर्धेतील आव्हान तर संपलेच, पण त्यामुळे राजस्थान आणि पंजाबच्या बाद फेरी गाठण्याच्या अशा जिवंत राहिल्या. पंजाबही चेन्नईविरुद्ध सामना जिंकू शकला नाही आणि त्यामुळे राजस्थानचा संघ बाद फेरीसाठी पात्र ठरला.

दरम्यान, मुंबईच्या पराभवानंतर चेन्नई विरुद्ध पंजाब सामन्यात पंजाबची सहमालक प्रीती झिंटा हिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये ती ‘मुंबईचा संघ बाद झाल्याने मी खूप खुश आहे’ असे म्हणताना स्पष्टपणे दिसली. लोकांनी तिच्या या वक्तव्याबद्दल ही अखिलाडूवृत्ती आहे, असे म्हणत तिच्यावर प्रचंड टीका केली.

मात्र मुंबई इंडियन्स बाद झाल्याचा आनंद नक्की तिला का झाला होता? हे तिने स्वतः ट्विटरच्या माध्यमातून सांगितले. ‘चाहत्यांनो थोडं थांबा! मुंबई इंडियन्सचा संघ बाद झाला असता तरच पंजाबला प्ले-ऑफ फेरी गाठण्याची संधी होती. (मुंबई स्पर्धेबाहेर झाली म्हणून नव्हे, तर पंजाबला अजूनही संधी आहे) या कारणासाठी मी तसे वक्तव्य केले होते. त्याचप्रमाणे चेन्नईने पंजाबला पराभूत केल्यानंतर राजस्थानच्या संघालाही निश्चितच आनंद झाला असणार. जेव्हा स्पर्धा शेवटच्या टप्प्यात येते, तेव्हा केवळ आपण जिंकून सगळं ठीक होत नाही, तर दुसऱ्याचा पराभवही परिणामकारक ठरतो’, असे ट्विट तिने केले.

याशिवाय, पंजाब संघ पात्रता फेरीत स्थान मिळवू शकला नाही, या बद्दलही प्रितीने चाहत्यांची माफी मागितली. पहिल्या ६ पैकी ५ सामने जिंकल्यावर साखळी फेरीतच पंजाब बाद होईल असे कोणालाही वाटले नव्हते. पंजाबचा संघ प्ले-ऑफ फेरी गाठू शकला नाही, त्यासाठी चाहत्यांनी आम्हाला ,माफ करावे. पंजाब पुढच्या वर्षी अधिक चांगली कामगिरी करेल, असेही ट्विट तिने केले.

Story img Loader