किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ यंदाच्या मोसमात चांगली कामगिरी करत असला तरी या संघात सध्या सर्व काही आलबेल नसल्याची माहिती समोर आली आहे. राजस्थान रॉयल्सकडून झालेल्या पराभवानंतर संघाचा मार्गदर्शक विरेंद्र सेहवाग आणि संघाची मालकिण प्रिती झिंटा यांच्यामध्ये वादावादी झाल्याचे वृत्त मुंबई मिररने दिले आहे.

राजस्थान रॉयल्सने दिलेले १५८ धावांचे लक्ष्य पंजाबच्या संघाला पार करता आले नाही. संघाच्या पराभवावर संतप्त झालेल्या प्रितीने सामन्याच्या रणनितीवरुन थेट सेहवागला जाब विचारला. प्रितीचे हे वर्तन सेहवागला अजिबात पटलेले नसून तो हा मोसम संपल्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबच्या मार्गदर्शक पदाचा राजीनामा देऊ शकतो असे वृत्तात म्हटले आहे. सेहवागने किंग्ज इलेव्हन पंजाब बरोबर पाच वर्षांचा करार केला आहे.

राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात कर्णधार रविचंद्रन अश्विनला फलंदाजीसाठी तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आली. करुण नायर, मनोज तिवारी असे सक्षम फलंदाज संघात असूनही अश्विनला वरती पाठवण्यात आले. अश्विन अपयशी ठरल्यामुळे हा डाव उलटला त्यावरुन प्रितीने सेहवागला धारेवर धरले.

संघाशी विनाकारण छेडछाड केल्यामुळे पराभव झाला असे प्रितीचे म्हणणे होते. त्यावर सेहवागने तिला समजावण्याचा प्रयत्न केला असे सूत्रांनी सांगितले. स्फोटक फलंदाज राहिलेला सेहवाग सडेतोड बोलण्यासाठी ओळखला जातो. सध्या तरी सेहवागने शांतता आणि संयम दाखवला आहे असे सूत्रांनी सांगितले.

प्रिती किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये सहमालक आहे. नेस वाडिया आणि उद्योगपती मोहित बर्मन यांचा सुद्धा पंजाब संघात हिस्सा आहे. सेहवागने अन्य मालकांना प्रितीला समजावण्यास सांगितले आहे. सेहवागच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार खेळाडूंचे लक्ष विचलित होऊ नये यासाठी तूर्तास सेहवागने या वादावर शांत राहण्याचे ठरवले आहे.

Story img Loader