चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे. धोनीने चेन्नईचे कर्णधारपद समर्थपणे पेलले असून चेन्नई धोनीच्या नेतृत्वाखाली नवव्यांदा प्ले ऑफ फेरीसाठी पात्र ठरली आहे. त्यामुळे धोनीच्या सक्षम कर्णधारपदाची जोरदार चर्चा आहे. मात्र धोनी एवढीच यंदाच्या आयपीएलमध्ये चर्चा आहे ती धोनीची मुलगी झिवा हिची. झिवा जवळपास सर्वच सामन्यात प्रेक्षकांमध्ये हजर राहते आणि वडिलांना आणि चेन्नईच्या संघाला चीअर करत असते.
चेन्नईच्या संघाचा रविवारी पुण्याला होम ग्राउंडवर सामना झाला. त्या सामन्यात चेन्नईने हैदराबादचा पराभव केला. अंबाती रायुडूने आयपीएलमधील पहिले शतक झळकावले. मात्र या सर्व गोष्टींपेक्षाही धोनीला अधिक सुखावणारी एक गोष्ट सामना संपल्यावर घडली. पुण्याच्या ग्राऊंड स्टाफने धोनीला एक खास भेट दिली. ती भेट म्हणजे धोनीचे झिवाबरोबरचे एक सुंदर पोट्रेट. या चित्रात धोनीने झिवाला कडेवर उचलून घेतले असल्याचे दिसते.
This #yellove is unparalleled. #PuneGroundStaff #whistlepodu #CSKvSRH pic.twitter.com/grfinBY9Sj
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 13, 2018
हे चित्र पाहून धोनी खूपच खुश झाला. त्याने स्टाफचे मनापासून आभार मानले आणि त्यांच्याबरोबर एक छानसा फोटोदेखील काढला. हा फोटो चेन्नई सुपर किंग्जने स्वतःच्या ट्विटर हॅण्डलवरून ट्विट केला आहे. ‘चेन्नईच्या संघाप्रति असलेले लोकांचे प्रेम हे अतुलनीय आहे.’ अशी कॅप्शनही या फोटोखाली दिली आहे.
दरम्यान, या मैदानावर यंदाच्या हंगामातील शेवटचा सामना चेन्नई आणि पंजाब यांच्यात २० मे रोजी खेळवण्यात येणार आहे.