मुंबई : मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध ९२ धावा करूनही यंदाच्या आयपीएलमधील स्वत:च्या कामगिरीबाबत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाचा कर्णधार विराट कोहली असमाधानीच आहे. कोहलीने धडाकेबाज खेळ करूनही बंगळूरु संघाला मंगळवारी पराभव पत्करावा लागला होता. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद २१३ धावा केल्या होत्या. २१४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बंगळूरु संघाला २० षटकांत ९ बाद १६७ धावांपर्यंतच पोहोचता आले होते. बंगळूरु संघाचा हा चार सामन्यांमधील तिसरा पराभव आहे.

कोहलीने आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत १५३ सामन्यांमध्ये ४,६१९ धावा करीत सुरेश रैनाचा ४,५५८ धावांचा विक्रम मोडला आहे. याबाबत तो म्हणाला, ‘‘मी जरी सर्वाधिक धावा केल्या असल्या तरी संघाला पराभव झाला, ही निश्चितच निराशाजनक गोष्ट आहे. आयपीएल सामन्यात केवळ ४०-५० धावा करून उपयोग नाही. किमान ८०-८५ धावा करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. मुंबईच्या गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यामुळे आम्हाला अपेक्षेइतका धावांचा वेग ठेवता आला नाही. ’’