आयपीएलचा यंदाचा हंगाम अगदी शेवटच्या साखळी सामन्यापर्यंत अटीतटीचा ठरणार आहे. त्यात आज बंगळुरू आणि राजस्थान यांच्यादरम्यान होणारा सामना हा महत्वाचा असणार आहे. स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी हा सामना जिंकणे दोन्ही संघांना अनिवार्य आहे. त्यामुळे दोनही संघ तयारीने मैदानात उतरतील.

खरे पाहता या सामन्यात बंगळुरूचे पारडे जड आहे. कर्णधार विराट कोहली, एबी डिव्हीलियर्स उत्तम लयीत लयीत आहेत. त्यामुळे राजस्थानच्या संघाने बंगळुरूला पराभूत करण्यासाठी एक ‘मास्टर प्लॅन’ तयार केला आहे.

राजस्थान आज आपल्या घरच्या मैदानावर सामना खेळणार आहे. त्यामुळे त्यांना बंगळुरूविरुद्ध रणनीती आखणे त्यांच्यासाठी अधिक सोपे जाणार आहे. राजस्थानला आपल्या मैदानाचा अंदाज आहे. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी राजस्थानचा मास्टर प्लॅन तयार आहे. याबाबत सांगताना राजस्थानचा गोलंदाज जयदेव उनाडकट म्हणाला की बंगळुरूचा संघ हा त्याच्या कर्णधाराप्रमाणेच निर्भीड आहे. कोणतीही भीड न ठेवता ते मैदानावर खेळतात. मात्र आज आम्ही त्यांच्यावर हल्ला करण्यास तयार आहोत. कारण आम्ही आमच्या घरच्या मैदानावर खेळणार आहोत. घरच्या मैदानाचा आम्हाला पुरेपूर अनुभव आहे आणि त्याचा आम्ही फायदा करून घेणार आहोत. त्यामुळे आम्हाला बंगळुरूला हरवणे तुलनेने सोपे जाणार आहे, असा विश्वास त्याने व्यक्त केला.

दरम्यान, यंदाच्या हंगामात राजस्थानकडून सर्वोत्तम खेळ करणारा सलामीवीर जोस बटलर आणि अष्टपैलू बेन स्टोक्स हे दोघे या महत्वाच्या सामन्यात सहभागी होऊ शकणार नाहीत. ते इंग्लंडच्या संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मायदेशी रवाना झाले आहेत. त्यांची उणीव राजस्थानच्या संघाला नक्कीच भासेल. पण आमच्याकडे पर्याय उपलब्ध आहेत, असेही उनाडकट म्हणाला.

Story img Loader