आयपीएलचा अंतिम सामना रविवारी मोठ्या जोशात खेळला गेला. सलामीवीर शेन वॉटसनने शतकी खेळी करत सामना चेन्नईला सहज जिंकून दिला. हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर झाला. या सामन्याला चेन्नई आणि हैदराबाद या दोन्ही संघाच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली. पण या साऱ्यांमध्ये एक गोष्ट चाहत्यांना खटकली. ती म्हणजे त्यांचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची वानखेडेवरील अनुपस्थिती. मुंबईतील महत्वाचा सामना आणि सचिन स्टेडियममध्येही नाही, हे चाहत्यांना पचनी पडले नाही.
सचिनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी सचिन मुंबईच्या मेंटॉरपदी असल्याने कायम मुंबईच्या सामन्याला हजर होता. पण मुंबईतच आयपीएलचा अंतिम सामना असूनही सचिन वानखेडेवर न दिसणं, हे चाहत्यांना जरा विचित्रच वाटलं. मैदानावर अनेक विक्रम मोडले गेले. पण स्टेडियममध्ये बसलेले चाहते आणि सेलेब्रिटींवर कॅमेरा गेला की चाहत्यांची नजर विक्रमवीर सचिनला शोधत होती. पण सचिन मात्र अंतिम सामन्याच्या वेळी वानखेडेवर उपस्थित नव्हता. त्यामुळे सचिन नक्की होता कुठे? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता.
या प्रश्नाचे उत्तर खुद्द सचिननेच चाहत्यांना दिले. सचिन हा सामना आपली पत्नी अंजली हिच्यासोबत एका विशेष व्यक्तीच्या घरी पाहत होता. या विशेष व्यक्ती म्हणजे भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर. सचिनने स्वतः त्यांच्या बरोबरचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. त्यात त्याने लिहिले आहे की यंदाचा आयपीएलचा अंतिम सामना मी आणि पत्नी अंजली यांनी लता दीदी यांच्या घरी पाहिला. आम्हाला त्यांच्यासोबत सामना पाहून आणि संवाद साधून विशेष आनंद वाटला.
The IPL ended on a high note … a great final between CSK vs SRH. Watching it with @mangeshkarlata Didi at her place made it even more special. pic.twitter.com/5WkO24vilx
— Sachin Tendulkar (@sachin_rt) May 28, 2018
सचिनने या ट्विटमध्ये अंतिम सामन्याबाबतही मत व्यक्त केले. अंतिम सामना हा उत्तम झाला. दोन्ही संघांनी सर्वोत्तम खेळ केला, असे सचिनने नमूद केले.
सचिनने हे ट्विट केल्यानंतर सचिनचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक करण्यात आले.