वानखेडे स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा ३१ धावांनी पराभव केला. अत्यंत कमी धावसंख्येच्या या सामन्यात मुंबई सहज जिंकेल असे वाटले होते पण हैदराबादच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत बलाढय मुंबईचा अवघ्या ८७ धावात खुर्दा उडवला. हैदराबादच्या या विजयात महत्वाची भूमिका बजावली ती अफगाणिस्तानचा लेगब्रेक गोलंदाज राशिद खानने. राशिद खानने चार षटकात फक्त ११ धावा देत दोन महत्वाच्या विकेट घेतल्या.

ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये नेहमीच धावांच्या राशी उभारल्या जातात तिथे निर्धाव षटक टाकणे खूप मोठी बाब आहे. राशिद खानने कालच्या सामन्यात निर्धाव षटक टाकले. अफगाणिस्तानच्या या युवा गोलंदाजाला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. मागच्या काही सामन्यातील निराशाजनक प्रदर्शनानंतर अखेर आपल्याला सूर गवसला त्याचा आनंद आहे अशी प्रतिक्रिया राशिद खानने दिली. याआधीच्या चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यात १९ वर्षाच्या राशिद खानने एक विकेटसाठी ४९ धावा आणि दुसऱ्या सामन्यात १ विकेटसाठी ५५ धावा मोजल्या होत्या.

काही खराब सामन्यांनंतर माझ्याकडून चांगली कामगिरी झाली त्यासाठी मी सर्वप्रथम अल्लाचे आभार मानतो. कोचिंग स्टाफमधील टॉम मुडी, मुरलीधरन आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याशी मी चर्चा केली त्याचा मला फायदा झाला. मी कुठलेही टेन्शन न घेता खेळाचा आनंद लुटला आणि मला यश मिळाले असे राशिद खानने सांगितले. आपल्या या कामगिरीचे श्रेय त्याने मुरलीधरन यांनाही दिले. जे काही घडतेय त्याचे टेन्शन घेऊ नको. शांत राहा आणि खेळाचा आनंद घे असा सल्ला मला मुरलीधरन यांनी दिला होता. त्याचाच मला फायदा झाला. हैदराबादने मुंबईला विजयासाठी ११८ धावांचे लक्ष्य दिले होते. पण मुंबईचा डाव फक्त ८७ धावात आटोपला.

Story img Loader