सनरायझर्स हैदराबादकडे असलेले गोलंदाजीतील वैविध्य इंडियन प्रीमिअर लीगमधील (आयपीएल) गुरुवारी होणाऱ्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात घातक ठरू शकते. हैदराबादने आपल्या पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा ९ विकेटने सहज पराभव केला. मुंबईला मात्र चुरशीच्या लढतीत चेन्नईकडून पराभव पत्करावा लागला होता.
हैदराबाद संघातील वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार चेंडूला स्विंग करण्यात पटाईत आहे. याबरोबरच फिरकीची धुरा सांभाळणाऱ्या रशीद खानचा लेगस्पिन आणि गुगली ओळखण्यात अजूनही फलंदाजांना अपयश येत आहे.
दुसरीकडे नावाजलेल्या खेळाडूंचा समावेश असलेल्या मुंबईने नेहमीप्रमाणे धिम्या गतीने सुरुवात केली आहे. कर्णधार रोहित शर्मासह सलामीवीर ईविन लेविस, अष्टपैलू किरॉन पोलार्ड यांच्याकडून धडाकेबाज खेळीची अपेक्षा मुंबईच्या चाहत्यांना आहे. लेगस्पिन गोलंदाजी करणाऱ्या मयांक मरकडेने पहिल्या सामन्यात चेन्नईच्या फलंदाजांची तारांबळ उडवली होती. तो कसा कामगिरी करतो, याकडे सर्वाचे लक्ष असेल.
- सामन्याची वेळ : रात्री ८ वा.
- थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.