मुंबईच्या वानखेडे मैदानावर उद्या ‘आयपीएल’चा अंतिम सामना रंगणार आहे. चेन्नई विरुद्ध हैदराबाद असा हा सामना होणार असून दोन्ही संघ कसून तयारी करत आहेत. साखळी फेरीत हैदराबादने चेन्नईला दोनही वेळा पराभूत केले होते. त्याचा वचपा काढत चेन्नईच्या संघाने आयपीएलची अंतिम फेरी गाठली आहे. तर, चेन्नईबरोबरच्या सामन्यात झालेल्या चुका दुरुस्त करत हैदराबादनेही कोलकाताला धूळ चारून अंतिम फेरी गाठली आहे.

पहिल्या पात्रता सामन्यात चेन्नईच्या संघाला हैदराबादविरुद्ध विजय प्राप्त झाला, ही सत्य परिस्थिती असली. तरी हा विजय निसटत्या स्वरूपाचा होता. त्यामुळे आधी झालेल्या चुका सुधारत आणि चेन्नईच्या कमकुवत बाजू ध्यानात घेऊन त्याचा फायदा मिळवत हैदराबाद चेन्नईवर विजय मिळवू शकेल आणि चषकावर नाव करू शकेल. हैदराबाद संघाच्या या ५ गोष्टी चेन्नईवर भारी पडू शकतात.

१. आक्रमक गोलंदाजी – यंदाच्या आयपीएलमधील सर्वात आक्रमक असा गोलंदाजांचा ताफा हैदराबाद संघाकडे आहे. रशीद खान हा फिरकीची जादू सर्वत्र पसरवत आहे. त्याच्या फिरकीच्या जाळयात त्याने विराट कोहली, महेंद्र सिंग धोनी अशा बड्या फलंदाजांना अडकवले आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार अंतिम षटकांमध्ये भेदक मारा करण्यात पटाईत आहे. तर सिद्धार्थ कौलच्या रूपाने एक चांगला जलदगती गोलंदाज भारताला मिळाला आहे. रशीद खान आणि सिद्धार्थ कौल यांनी दोघांनी मिळून २१ गडी बाद केले आहेत.

२. लक्षवेधी फलंदाजी – हैदराबादच्या संघाकडे चांगली आणि स्फोटक अशी फलंदाजांची फौज आहे. कर्णधार केन विल्यमसन, वृद्धिमान साहा, शिखर धवन, शाकिब अल हसन यासारखे फलंदाज भागीदारी करून चांगली धावसंख्या उभारू शकतात. तर दीपक हुडा, युसूफ पठाण आणि कार्लोस ब्रेथवेट हे फलंदाज उत्तुंग षटकार मारण्यास सक्षम आहेत. त्यातच रशीद खानही फलंदाही करू शकतो, हे त्याने कोलकाताविरुद्धच्या सामन्यात दाखवून दिल्याने संघाचा आत्मविश्वास वाढला आहे.

३. चपळ क्षेत्ररक्षण – हैदराबाद संघ हा क्षेत्ररक्षण करण्यातही उत्तम आहे. यंदाच्या हंगामात शिकार धवनने सर्वाधिक १२ झेल टिपले आहेत. त्यातील २ झेल हे कौतुकास पात्रही ठरले आहेत. वृद्धिमान साहा हा यष्टिरक्षक म्हणून अनुभवी आहे. तसेच, इतर खेळाडूदेखील मैदानावर चपळतेने क्षेत्ररक्षण करत असल्यामुळे अनेकदा कमी धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना प्रतिस्पर्ध्यांना पराभव स्वीकरावा लागला आहे.

४. केन विल्यमसनचे नेतृत्व – न्यूझीलंड संघाच्या नेतृत्वाचा अनुभव असलेला केन विल्यमसन हैदराबाद संघाचे कर्णधारपद सक्षमपणे सांभाळत आहे. चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणी बंदी घालण्यात आलेल्या डेव्हिड वॉर्नरच्या जागी विल्यमसनला नेतृत्वाची धुरा देण्यात आली होती. त्याने साखळी फेरीत ही जबाबदारी नीट पार पाडली आणि गुणतक्त्यात संघाला अव्वल स्थान मिळवून दिले. त्याने काही बड्या खेळाडूंऐवजी नवोदित खेळाडूंना संधी दिली आणि त्याचे नवोदित खेळाडूंनी सोने केले. सिद्धार्थ कौल हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे.

५. हुकुमी एक्का रशीद खान – रशीद खान हा हैदराबाद संघाचा हुकुमी एक्का आहे. कोलकात्याविरुद्धच्या पात्रता फेरी २च्या सामन्यात त्याने त्याची उपयुक्तता सिद्ध केली आहे. रशीदने यंदाच्या आयपीएलमध्ये ६.७८च्या सरासरीने धावा दिल्या असून २१ गडी बाद केले आहेत. कोलकाताविरुद्धच्या सामन्यात त्याने केलेली १० चेंडूत नाबाद ३४ धावांची खेळीही त्याला वेगळेच महत्व दिलून गेली आहे. त्यामुळे तो हैदराबाद संघाचा हुकुमाचा एक्का आहे.

Story img Loader