किंग्ज इलेव्हन पंजाब संघावर १० गडी राखून मात करत विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने, प्ले-ऑफच्या शर्यतीत आपलं आव्हान कायम राखलं आहे. बंगळुरुच्या संघाकडून कर्णधार विराट कोहली यंदा चांगलाच फॉर्मात आहे. आतापर्यंतच्या सामन्यात विराटने फलंदाजीत आपली चुणूक दाखवून दिली आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यानंतर विराटने अकराव्या हंगामात ५०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत आयपीएलच्या पाच हंगामांमध्ये विराट कोहलीने हा कारनामा करुन दाखवला आहे. अशी कामगिरी करणारा विराट हा पहिलाच फलंदाज ठरला आहे.
२०११ च्या हंगामात विराट कोहलीने ५५७ पेक्षा जास्त धावांची लयलूट केली होती. यानंतर २०१३ च्या हंगामात ६३४ तर २०१५ च्या हंगामात ५०५ धावा विराटच्या खात्यात जमा आहेत. २०१६ चा हंगाम विराटचा आयपीएलमधील सर्वोत्तम काळ मानला जातो. ४ शतकांसह विराटने २०१६ च्या हंगामात ९७३ धावा पटकावल्या होत्या. या यादीमध्ये विराट कोहलीच्या मागे डेव्हिड वॉर्नर, सुरेश रैना, ख्रिस गेल, गौतम गंभीर आणि सचिन तेंडुलकर हे खेळाडू आहेत.
पंजाबविरुद्धच्या सामन्यात पार्थिव पटेलच्या साथीने खेळताना विराटने बंगळुरुच्या डावाला आकार दिला. ४८ धावा काढत विराटने संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला होता. आतापर्यंत बंगळुरुच्या संघाने तीनवेळा अंतिम सामन्यात धडक मारली आहे, मात्र स्पर्धेचं विजेतेपद मिळवण्यात त्यांना अपयश आलेलं आहे. त्यामुळे अकराव्या हंगामात विराट कोहलीचा संघ प्ले-ऑफची फेरी गाठतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.