पुण्याच्या ऋतुराज गायकवाडने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) चेन्नई सुपर किंग्जकडून चमकदार कामगिरी केली. ही कामगिरी करताना त्याने कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे मनही जिंकले. मात्र मधल्या फळीतील हा फलंदाज सलामीवीर बनण्यामागे ऋतुराजच्या प्रशिक्षकांचे महत्त्वपूर्ण योगदान होते.

संदीप चव्हाण या ऋतुराजच्या प्रशिक्षकांना आजही सात वर्षांपूर्वीचा काळ आठवला. चव्हाण म्हणाले, ‘‘वेंगसरकर क्रिकेट अकादमीत १६ वर्षांचा ऋतुराज मधल्या फळीत फलंदाजी करत होता. त्या वेळेस तो महाराष्ट्राकडून वयोगटांचे क्रिकेट खेळायचा. मात्र क्लब स्तरावरील लढतींमध्ये सलामीला फलंदाजी करण्याचा सल्ला मी त्याला दिला. भविष्यात त्याचा तुला उपयोग होईल असेही सांगितले. मांडके चषकात ऋतुराज सलामीला उतरला आणि दोन्ही डावांत अनुक्रमे १०० व ९० धावा केल्या. आता तो दर्जेदार सलामीवीर बनला आहे.

कोल्हापूरविरुद्धच्या लढतीने कारकीर्दीला कलाटणी!

ऋतुराजचे आणखी एक प्रशिक्षक मोहन जाधव यांनी त्याच्या कारकीर्दीतील निर्णायक क्षण सांगितला. ‘‘एका स्पर्धेदरम्यान ऋतुराज पहिल्या दोन लढतींमध्ये अपयशी ठरला होता. मात्र त्या स्पर्धेतील कोल्हापूरविरुद्धच्या अखेरच्या लढतीत त्याला दिलेला सल्ला उपयोगी ठरला. ही तुझी अखेरची लढत आहे असे समजून फलंदाजी कर असे मी त्याला सांगितले आणि त्याने १८२ धावा फटकावल्या. त्यानंतर ऋतुराजची महाराष्ट्राच्या कनिष्ठ संघात निवड झाली. कोल्हापूरविरुद्धची खेळी त्याच्या कारकीर्दीतील निर्णायक क्षण ठरली,’’ असे जाधव यांनी सांगितले.

Story img Loader