आयपीएलच्या तेराव्या हंगामाची अंतिम फेरी गाठण्यासाठी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्ससमोर आज सनराईजर्स हैदराबादचं आव्हान आहे. पहिल्या क्वालिफायर सामन्यात मुंबईने दिल्लीवर ५७ धावांनी मात करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. दिल्लीची फॉर्मात नसलेली फलंदाजी हा त्यांच्यासाठी चिंतेचा विषय ठरतो आहे. मुंबईविरुद्ध सामन्यात दिल्लीचे ३ आघाडीचे फलंदाज शिखर धवन, पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे हे भोपळाही न फोडता माघारी परतले. सलामीच्या जागेवर पृथ्वी शॉचं अपयशी ठरणं ही दिल्लीसाठी गंभीर समस्या बनली आहे. यासाठी दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्लीने पृथ्वी शॉला संघाबाहेर करत अजिंक्य रहाणेला संधी द्यावी अशी मागणी होत आहे. परंतू भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने पृथ्वी शॉला आपला पाठींबा दर्शवत अजिंक्य रहाणेचा सलामीच्या जागेवर प्रभाव पडत नसल्याचं सांगितलं.

अवश्य वाचा – IPL 2020 : ट्रेंट बोल्टला मुंबईकडे देऊन दिल्लीने सर्वात मोठी चूक केली – टॉम मूडी

“माझ्या दृष्टीने दिल्लीला सलामीला Impactful खेळाडूची गरज आहे. विशेषकरुन करो या मरो च्या सामन्यात…पृथ्वी शॉ सध्या चांगल्या फॉर्मात नाही याची मला जाणीव आहे. पण असं असलं तरीही अजिंक्य रहाणेही काही फार चांगल्या फॉर्मात नाहीये. त्यातच रहाणेला तुम्ही तिसऱ्या क्रमांकावर खेळायची संधी दिली तरीही त्या जागेवर त्याचा फारसा प्रभाव पडत नाही. सध्याचा फॉर्म पाहता पृथ्वी शॉ ऐवजी रहाणेला संधी दिली जाऊ शकते…पण मला विचाराल तर मी पृथ्वी शॉ ची निवड करेन. तो पहिली सहा षटकं मैदानावर टिकला तर सामन्याचं चित्र पालटू शकतं. अजिंक्य रहाणे मैदानावर स्थिरावण्यासाठी खूप वेळ घेतो.” गौतम गंभीर ESPNCricinfo शी बोलत होता.

साखळी फेरीत सुरुवातीच्या टप्प्यांत दिल्लीने चांगली कामगिरी केली होती. परंतू अखेरच्या टप्प्यांतील काही सामन्यांमध्ये त्यांना सलग पराभवाचा सामना करावा लागला. RCB विरुद्ध सामन्यात दिल्लीने अजिंक्य आणि शिखर धवनच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर विजय मिळवला…परंतू मुंबई विरुद्धच्या सामन्यात त्यांच्या फलंदाजीतले कच्चे दुवे पुन्हा एकदा उघड झाले. त्यामुळे हैदराबादविरुद्धच्या सामन्यात दिल्लीला आपला सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे.