कोलकाता नाईट रायडर्स संघाने आपल्या संघात अमेरिकेचा जलदगती गोलंदाज अली खानला संघात जागा दिली आहे. दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार घ्यावी लागलेल्या हॅरी गुर्नेच्या जागी अली खान कोलकाता नाईट रायडर्स संघाचं प्रतिनिधीत्व करेल. २९ वर्षीय अली खान आयपीएलमध्ये खेळणारा पहिला अमेरिकन क्रिकेटपटू ठरणार आहे. ESPNCricinfo ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. गुर्नेच्या खांद्यावर शस्त्रक्रीया होणार असल्यामुळे त्याने स्पर्धेतून माघार घेतली आहे.
नुकत्यात पार पडलेल्या कॅरेबिअन प्रिमीअर लिग स्पर्धेत अली खानने त्रिंबागो नाईट रायडर्स संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. CPL स्पर्धेत अली खानने केलेली चांगली कामगिरी पाहता कोलकाता नाईट रायडर्सने त्याला संघात जागा देण्याचं ठरवलं आहे. यंदाच्या CPL हंगामात अली खानने ८ सामने खेळले ज्यात त्याने ७.४३ च्या इकोनॉमी रेटने ८ बळी घेतले. त्रिंबागो नाईट रायडर्सच्या अंतिम सामन्यातही अली खानने महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. सातत्याने १४० च्या गतीने चेंडू टाकण्याचं कौशल्य अली खानकडे असल्यामुळे यंदा कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी तो अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.