सलामीवीर इशान किशनचं अर्धशतक आणि त्याला क्विंटन डी-कॉकने दिलेली भक्कम साथ या जोरावर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर ९ गडी राखून विजय मिळवला. प्ले-ऑफ्सचं तिकीट मिळवलेल्या मुंबईने दिल्लीवर मात करत इतर दिल्लीची ‘प्ले-ऑफ्स’साठीची वाट खडतर केली. जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट या दोघांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या बळावर मुंबईने दिल्लीला ११० धावांवर रोखलं. हे माफक आव्हान मुंबईने सहज पार केले.
१११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना किशन आणि डी-कॉक जोडीने पहिल्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. सलामीची जोडी मुंबईला विजय मिळवून देणार असं वाटत असताना डी-कॉक बाद झाला. बचावात्मक फटका खेळताना तो विचित्र पद्धतीने बाद झाला. एनरिक नॉर्येने वेगाने टाकलेला चेंडू त्याने संयमी फटका मारत थांबवला. पण चेंडू टप्पा पडल्यावर थेट जाऊन स्टंपच्या अगदी वरती लागला. डी कॉकने चेंडू पायाने थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्यात तो अयशस्वी ठरला.
डी कॉकची विचित्र विकेट…
डी कॉक २६ धावांवर बाद झाल्यावर इशानने सूर्यकुमारच्या साथीने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. इशान किशनने नाबाद ७२ धावांची खेळी केली.
त्याआधी, दिल्लीचे सलामीवीर शिखर धवन आणि मुंबईकर पृथ्वी शॉ झटपट बाद झाले. कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३५ धावांची भागीदारी केली. अय्यर (२५) आणि पंत (२१) एकापाठोपाठ बाद झाले. त्यानंतर दिल्लीच्या डावाला लागलेली गळती थांबलीच नाही. मुंबईकडून बुमराह, बोल्टने ३-३ तर कुल्टर-नाईल, राहुल चहरने १-१ बळी टिपला.