पंजाब आणि चेन्नई यांच्यातील सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकली आणि प्रथम लोकेश राहुलच्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. प्रथम फलंदाजी करताना पंजाबच्या सलामीवीरांनी चांगली सुरूवात केली. कर्णधार राहुल आणि मयंक अग्रवाल अर्धशतकी भागीदारी करण्याच्या नजीक असताना मयंक २६ धावांवर बाद झाला.

पंजाबने पहिला बळी गमावल्यानंतर लोकेश राहुल आणि ख्रिस गेल डाव सांभाळतील अशी शक्यता होती. राहुल चांगली खेळी करत होता, पण तो अजब प्रकारे त्रिफळाचीत झाला. लुंगी एन्गीडीने वेगात बदल करत अतिशय संथ गोलंदाजी केली. चेंडू हवेत अतिशय हळू आला आणि राहुलच्या पायाजवळ टप्पा पडला. चेंडू कमी वेगाने आल्याने राहुलने आधीच बॅट फिरवली होती. त्यामुळे तो त्रिफळाचीत झाला. तो अशा प्रकारे बाद झाल्याने संघमालक प्रिती झिंटानेही संकटाची चाहुल लागल्याची प्रतिक्रिया दिली.

राहुल चांगली फलंदाजी करत असताना ३ चौकार आणि १ षटकार २९ धावांवर माघारी परतला. त्यानंतर पंजाबने ठराविक अंतराने गडी गमावले. ख्रिस गेल १९ चेंडूत १२ धावा काढून बाद झाला. निकोलस पूरन २ धावांवर तंबूत परतला. मनदीप सिंग आणि दीपक हुड्डा जोडीने संघाला स्थैर्य देण्याचा प्रयत्न केला, पण त्याच प्रयत्नात मनदीप १४ धावांवर बाद झाला.