पंजाब आणि चेन्नई यांच्यातील सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकली आणि प्रथम लोकेश राहुलच्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. या नाणेफेकीच्या वेळी दोन्ही कर्णधारांनी आपापल्या संघातील बदल सांगितले. पंजाबने ग्लेन मॅक्सवेल, अर्शदीपला संघाबाहेर केलं आणि त्याजागी जेम्स निशम, मयंक अग्रवालला संघात स्थान दिलं. चेन्नईनेदेखील शेन वॉटसनला संघाबाहेर ठेवच फाफ डु प्लेसिसला संघात घेतलं. पण या नाणेफेकीच्या वेळी धोनीला विचारलेला प्रश्न आणि त्याचं धोनीने दिलेलं उत्तर जास्त चर्चेत राहिलं.

नाणेफेक जिंकल्यावर धोनी अँकरशी बोलण्यासाठी पुढे आला. हा चेन्नईचा यंदाच्या हंगामातील शेवटचा सामना असल्याने अँकर डॅनी मॉरिसनने धोनीला एक प्रश्न विचारला. पिवळ्या जर्सीत म्हणजेच चेन्नईकडून हा तुझा कारकिर्दीतील शेवटचा सामना असू शकतो का? असं त्याला विचारण्यात आलं.

धोनीनं दिलं उत्तर…

धोनीला या प्रश्नांची दीर्घकाळापासून सवय आहे. आंतरराष्ट्रीय निवृत्तीच्या चर्चेबाबतही धोनीला अनेकदा असे प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामुळे आजही त्याला असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर धोनीने, “(हा माझा पिवळ्या जर्सीतील शेवटचा सामना) नक्कीच नसेल”, असं उत्तर दिलं.

दरम्यान, IPLच्या इतिहासात पहिल्यांदाच धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईच्या संघाला साखळी फेरीत गाशा गुंडाळावा लागला.